नवी दिल्ली - देशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना एक पत्र लिहून देशातील न्यायपालिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयीन क्षेत्रात एका खास गटाचा राजकीय हस्तक्षेप वाढत आहे, अशी भीती वकिलांनी व्यक्त केली आहे. वकील हरीश साळवे, उज्वला पवार, मनन कुमार मिश्रा, अदीश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंक आनंद, हितेश जैन, उदय होल्ला यांच्यासह इतर वकिलांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत. (Political interference increased in court)
या पत्रात खासगी किंवा राजकीय कारणासाठी न्यायालयीन प्रक्रियत हस्तक्षेप वाढत आहे. याला आळा घालणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करतो की, अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपल्या न्यायालयीन क्षेत्राचे अशा हल्ल्यांपासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. काहीही न करणे किंवा गप्प बसल्याने अशा विरोधी शक्तींची ताकद आणखी वाढेल.ही शांत बसण्याची वेळ नाही. कारण न्यायसंस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे आणि तो आता वारंवार होत आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
न्यायदानाचे काम करणा-या लोकांनी आता आपल्या न्यायसंस्थेला वाचवण्यासाठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचा एक स्तंभ असलेल्या आपल्या न्यायपालिकेला अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणे आणि याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. तरच न्यायपालिकेवरील हल्ले रोखता येतील, असा उल्लेख पत्रामध्ये आहे. अशा कठीण प्रसंगी तुमचे नेतृत्व महत्त्वाचे ठरु शकते. आम्हा सर्वांचा तुमच्यावर आणि सर्व न्यायमूर्तींवर विश्वास आहे, आम्हाला यावर मार्गदर्शन करावे आणि न्यायपालिकेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे. न्यायपालिकेचा सन्मान आणि प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी आम्ही आवश्यक ते करण्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्या नेतृत्त्वाकडे आशेने पाहत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment