Lok Sabha Election - इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो - मंत्री उदय सामंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2024

Lok Sabha Election - इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो - मंत्री उदय सामंत


मुंबई - कालचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र सभा घेऊन सुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून कालचा इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोडले आहे. ते मुंबईत बोलत होते.

कालच्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यावरून आज मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा आणि त्यांच्या मित्र पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, वंदनीय बाळासाहेब जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्याच्या सभेमध्ये असते.

वंदनीय बाळासाहेबांचा विसर -
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, कालच्या मेळाव्यात उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदनीय बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. इतर पक्षाच्या नेत्याने वंदनीय बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील आपल्या भाषणात केला नाही. अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या तर भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, एवढेच या मेळाव्यात सुरु होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले. त्यामुळे आमच्या महायुती सरकारला कुणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे आणि महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील याची मला खात्री आहे.

भाषण ४५ वरून ५ मिनिटात उरकावं लागलं -
यापूर्वी शिवसेना अखंड असताना छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये वंदनीय बाळासाहेबांचे भाषण शेवटचे असायचे. त्यांच्या पश्च्यात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले त्यावेळेस ते ४५ मिनिटे भाषण करायचे. पण कालच्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचना केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली, हे अतिशय दुःखदायक आहे. कुणाला वाटो न वाटो पण आमच्यासाठी ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात उबाठा काँग्रेसमय होऊन नाना पटोले यांच्या निर्देशानुसार काम करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हीन दर्जाची टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या बरोबर स्वतंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ बसून आपण काय साध्य केले याचे उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनतेसमोर द्यावे लागेल. मला फक्त पाच प्रश्न उद्धव ठाकरे आणि उबाठाच्या नेत्यांना विचारायचे आहेत.

१. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर वंदनीय बाळासाहेब भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो अशी करत असतात. मग कालच्या मेळाव्यात भाषणाची सुरुवात अशी का झाली नाही?
२. पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला लेख ज्यावेळेस काँग्रेसच्या एका नेत्याने फाडला होता. त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण देशात जोडे मारो आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सावरकर हे क्रांतिकारी स्वतंत्र्यवीर होते, असे तुम्ही ठणकावून सांगणार आहात का? काल राहुल गांधी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गेले, पण त्याच्याच बाजूला असेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत, पण ते गेले नाहीत म्हणून महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी सुद्धा सावरकरांचा विचार सोडला आहे का?
३. वंदनीय बाळासाहेबांनी सांगितले होते की, भविष्यात काँग्रेसच्या सोबत जाण्याची वेळ आल्यास मी शिवसेनेचे दुकान बंद करेन, याबद्दल उबाठा प्रमुख व उबाठा नेते शिवसैनिकांना उत्तर देणार का?
४. संपूर्ण देशात समान नागरिक कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. तो कायदा लागू होणार आहे, त्याचे समर्थन उबाठा प्रमुख करणार का?
५. काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे. त्याचे समर्थन कालच्या मेळाव्यात राहुल गांधींसोबत बसलेले सर्वपक्षीय नेते करणार का?
हे माझे पाच प्रश्न आहेत आणि याची उत्तरे मला उबाठा प्रमुखांकडून अपेक्षित आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad