भिवंडी येथील संकेत भोसले या अल्पवयीन विद्यार्थ्याची किरकोळ कारणास्तव अमानुषपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर रमाबाई कॉलनी ते राजभवन असा पायी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात मृत संकेत भोसले यांचे आईवडील भाऊ बहिण आणि त्याच्या नातेवाईकांचा समावेश होता. सकाळी ११ वाजता रमाबाई कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलक जमा व्हायला सुरुवात झाली. ही संख्या वाढतच गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांचा राजभवनकडे जाण्याचा मार्ग रोखला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली. महिला आंदोलकांना ही याचा फटका बसला. अशोक कांबळे यांच्यासह काही आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पोलीस प्रशासन व राज्य सरकारचा निषेध केला.
संकेत भोसले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, मुख्य आरोपी शिवसेना भिवंडी शहर उप प्रमुख कैलास धोत्रे व त्याचे साथीदार यांच्या अवैध धंद्याची इडी चौकशी लावून त्यांची मालमत्ता जप्त करावी, संकेत भोसले याच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे. राज्यातील मागासवर्गीय वस्त्यांना संरक्षण व आवश्यक त्यांना शस्त्र परवाने देण्यात यावेत, मागासवर्गीयांवरील अन्याय प्रकरणी सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी अशा मागण्या यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आल्या.
भीम आर्मीचे अशोक कांबळे, अविनाश गरुड, सुनील थोरात, अविनाश गायकवाड, सुशीला कापुरे, बाळू साले, कृष्णा दांडगे, श्रीकांत धावारे, संतोष वाकले, विजय कांबळे, जाहीद अली, तुषार कदम, सुनील वाकोडे, प्रकाश पाईकराव, सुरेश धाडी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर आंबेडकरी चळवळीतील मंगेशभाई पगारे, आनंद शिंदेकर, विलास रूपवते, सो. ना कांबळे, स्नेहा गांगुर्डे यांच्यासह भिवंडीतील एम गी ग्रुप संकेत भोसले यांचे वडील सुनील भोसले, आई सुकुमार भोसले, सुकेशिनी भोसले, शालिनी बनसोडे, प्रदीप बनसोडे यांच्यासह हजारो महिला पुरुषांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment