मुंबई - भांडुप पंपिंग स्टेशन येथील प्रस्तावित फ्लेमिंगो पार्कसाठी फ्लोटींग जेट्टी लिंक स्पॅन व जोड रस्ता कामाचे भूमीपूजन ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक यांच्याहस्ते पार पडले. कोटक यांनी २०१९ पासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पुर्व उपनगरात पहिलं सुसज्ज फ्लेमिंगो पार्क उभं राहत आहे. या भूमीपूजन सोहळ्यासाठी जयप्रकाश सिंह, नगरसेवक मंगेश पवार, नगरसेविका सारिका मंगेश पवार, गौतम निर्भवणे, युवराज मोरे, रमेश सिंह, विरेंद्र महाडिक, देवेंद्र डोके, विश्वास घाग, प्रथमेश राणे, केतकी सांगळे, प्रवीण फोंडे, सुमित खामकर, नील सूंभे, जितेश भोईर, संदेश पोवार, भाजप पदाधिकारी, कोळी बांधव, व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षी थंडीच्या महिन्यात हजारो किमीचा प्रवास करून भांडुप पंपिंग स्टेशन येथील खाडी भागात सहा महिन्यांसाठी स्थलांतर करतात. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षी निरिक्षकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र या पर्यटकांच्या सुरक्षेची कुठलीही ठोस तरतूद वा सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध नव्हत्या. ही बाब २६ नोव्हेंबर २०१९ रोजी खासदार मनोज कोटक यांनी संसदेत मांडली होती. तसेच याठिकाणी फ्लेमिंगो पार्क तथा पक्षी निरिक्षण उद्यान व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली होती. या विषयाची तत्काळ दखल घेत संबंधित विभागांकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यात आल्या असून लवकरच वन विभागातर्फे भांडुप पंपिंग स्टेशन येथे एक सुसज्ज फ्लेमिंगो पार्क उभे राहणार आहे. पक्षी प्रेमींसह पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.
या कामाचा पहिला टप्पा म्हणून फ्लेमिंगो पार्कसाठी फ्लोटींग जेट्टी लिंक स्पॅन व जोड रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांतर्गत पर्यकांसाठी फेरी बोटसेवा, फ्लोटींग जेट्टी, सौर दिवे, उद्यानासाठी बाके, जेट्टीकडे जाणारे रस्ता आदी कामांचा समावेश आहे. याबाबत बोलताना, ‘केंद्र सरकारच्या अमृत तसेच मिष्टी या योजनांच्या आधारे फ्लेमिंगो पार्कची संकल्पना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या पार्कमुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, सोबत स्थानिक भुमिपुत्रांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. तसेच यापूर्वी निर्माण होणारा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे. पुढील वर्षभरात एक सुसज्ज फ्लेमिंगो पार्क मुंबईकराच्या सेवेत दाखल होईल, असे खासदार मनोज कोटक म्हणाले.
No comments:
Post a Comment