स्वच्छतेसाठी १२०० कोटींच्या निविदा रद्द करा, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 March 2024

स्वच्छतेसाठी १२०० कोटींच्या निविदा रद्द करा, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन


मुंबई - मुंबईत स्वच्छतेचे काम पालिकेच्या सफाई कामगारांकडून केले जाते. मात्र सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पालिकेकडून कंत्राटी कामगारांकडून स्वच्छता केली जात आहे. या कंत्राटी पद्धतीमुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने १२०० कोटींच्या निविदा रद्द कराव्यात, ही कामे महिला बचत गट, बेरोजगार संस्थांना देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगारांसह काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसने (Rashtravadi Congress) पालिका मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
 
मुंबईतील विशेष झोपडपट्टीतील स्वच्छतेसाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने जागतिक स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली आहे. याआधी सफाईच्या कामात वर्षांला ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. तो आता वार्षिक ३०० कोटी व चार वर्षांच्या कंत्राटासाठी एकूण १२०० कोटी येणार आहे. मुंबईत सुमारे आठ हजार सार्वजनिक शौचालयांच्या नियमित स्वच्छतेचे काम जागतिक स्तरावरील कंपन्यांना देण्यात येणार आहे.

पालिकेच्या या दोन्ही प्रस्तावित कंत्राटांना विरोध करण्यासाठी कंत्राटी सफाई कामगार संघटनांनी बुधवारी पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आप, कम्युनिस्ट पक्ष यासह इंडिया आघाडीतील सहपक्षही या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिका मुख्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पालिका मुख्यालय आणि समोरील रस्ते बॅरिकेडस लावून बंद करण्यात आले होते. हे बॅरिकेड्स पाडून आंदोलकांनी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

त्यानंतर आंदोलनाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मुख्यालयात जाण्यापासून अडवण्यात आले. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, कम्युनिस्ट नेते काॅ. प्रकाश रेड्डी, कचरा वाहतूक श्रमिक संघाचे काॅ. दादाराव पाटेकर यांच्यासह अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले होते. एका विशिष्ट बड्या राजकीय नेत्याच्या कंपनीला झोपडपट्ट्यांमधील व शौचालय सफाईचे कंत्राट देण्यासाठी पंधरा हजारांहून गरीब कामगारांच्या व हजारो महिलांच्या पोटावर पाय आणला जातो आहे, असा आरोप काॅ. प्रकाश रेड्डी यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad