मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्वपदावर येत आहे. सद्यस्थितीत दोन ट्रान्सफार्मर सुरु होवून त्या आधारे २० पैकी १५ पंप सुरू करण्यात आले आहेत. असे असले तरी, तिसरा ट्रान्सफार्मर सुरु होण्यास दिनांक ५ मार्च २०२४ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. या कारणाने, संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. (Water cut in mumbai)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला काल (दिनांक २६ फेब्रुवारी २०२४) सायंकाळी लागलेली आग रात्री दहा वाजता विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले. आज (दिनांक २७ फेब्रुवारी २०२४) पहाटे चार वाजेपासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले. तर, सकाळी नऊ वाजेपासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला व त्यावर पिसे उदंचन केंद्रातील इतर सात पंप हळूहळू सुरू करण्यात आले. अशा रितीने सद्यस्थितीत पिसे केंद्रातील २० पैकी सुमारे १५ पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
पिसे येथील जलउदंचन केंद्रातील उर्वरित पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच परिरक्षणाखाली असलेला तिसऱ्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यासाठी साधारणतः दिनांक ५ मार्च २०२४ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. अशा रितीने संपूर्ण पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यास साधारणतः दिनांक ५ मार्च २०२४ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. यास्तव बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे होणारा एकूण पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने आज (दिनांक २७ फेब्रुवारी २०२४) मध्यरात्रीपासून दिनांक ५ मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. या पाणी कपातीमुळे विभागातील पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाचा भाग व डोंगराळ उंचीवरील भाग यास थोड्या अधिक प्रमाणात अपुरा पाणीपुरवठा जाणवू शकतो.
अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा कमी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे. मुंबईकर नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया सदर कपातीच्या कालावधीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment