मुंबई - समाजात मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक द्यायला हवी. आज प्रत्येक क्षेत्रात मुली-मुलांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्यामुळे ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या अभियानाला अधिक चालना द्यायला हवी. तसेच आजचे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे या मुलांचे वाचन वाढावे यासाठी ‘ लायब्ररी इन बॅग’ सारखे उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरतील, असा आशावाद शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच शिक्षणासह मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये लवकरच ‘हॅप्पी सॅटर्डे’ (आनंदी शनिवार) ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी-फेस शाळेत आज (दिनांक ९ फेब्रुवारी २०२४) स्त्री शिक्षणावर आधारित ‘आय अॅम बनी’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला. तसेच ‘लायब्ररी इन बॅग’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.
उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना ‘लायब्ररी इन बॅग’ किटचे वाटप करण्यात आले. तसेच दुपारनंतर विद्यार्थ्यांना शाळेत ‘आय अॅम बन्नी’ हा चित्रपट दाखविण्यात आला.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, ‘लायब्ररी इन बॅग’ हा अतिशय चांगला उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढण्यास मदत होईल. त्यांचे वक्तृत्व सुधारेल. मुलांनी आठवड्यातील दोन तास अवांतर वाचन करायला हवे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून महानगरपालिकेच्या १२० शाळांत ‘लायब्ररी इन बॅग’ किट देण्यात येणार आहे. याशिवाय बालभारतीकडून उर्वरित शाळांमध्ये हे किट्स पुरविण्यात येतील. यापुढे प्रत्येक शाळेत ‘हॅप्पी सॅटर्डे’ ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे. शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी मुलांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त केवळ अवांतर वाचन, खेळ, छंद जोपासणे आदी उपक्रम राबविण्यात येतील. याशिवाय ‘आय अॅम बन्नी’ हा चित्रपट राहुल कनाल यांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ६० हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य दाखविण्यात येईल, अशी माहिती देखील केसरकर यांनी दिली.
उप आयुक्त चंदा जाधव यांनी ‘आय अॅम बन्नी’ या चित्रपटाविषयी तसेच ‘लायब्ररी इन बॅग’ या उपक्रमाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मुलांचे वाचन जितके जास्त, तितके त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल. संचालक प्राची जांभेकर म्हणाल्या, शाळेतील प्रत्येक मुलास वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘लायब्ररी इन बॅग’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नायरा एनर्जी या संस्थेच्या सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला. १२० शाळांना हे किट देण्यात येणार असून, त्याद्वारे ३० हजार मुलांना पुस्तके हाताळता येणार आहेत.
No comments:
Post a Comment