मुंबई (अजेयकुमार जाधव) - देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा आर्थसंकल्प आज (2 फेब्रुवारीला) सादर केला जात आहे. हा अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत सतत बदल केले जात असल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालिका प्रशासनाच्या आणि आयुक्तांच्या या सावळा गोंधळाचा निषेध व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवड्यात सादर केला जातो. गेल्या वर्षी हा अर्थसंकल्प 52 हजार कोटींचा सादर करण्यात आला. दरवर्षी शिक्षण विभाग आणि मुख्य अर्थसंकल्प असे दोन अर्थसंकल्प शिक्षण समिती तसेच स्थायी समितीमध्ये सादर केले जात होते. मार्च 2022 मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिका आयुक्तांना प्रशासक नियुक्त करण्यात आले. प्रशासक नियुक्तीनंतर पालिकेचा सर्व कारभार आयुक्तांच्या हाती आला आहे.
2 फेब्रुवारी रोजी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाईल असे घोषित करण्यात आले. त्यासाठी दुपारी 12 वाजता शिक्षण आणि मुख्य अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली. त्यानंतर त्यात बदल करून सकाळी 10 वाजता शिक्षण तर मुख्य अर्थसंकल्प सकाळी 10.30 वाजता सादर केला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यात बदल करून सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल असे सांगण्यात आले.
पत्रकारांमध्ये नाराजी -
अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत सतत बदल केले जात असल्याने पालिकेचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांना गृहीत धरणे, पत्रकारांना हवं तर येतील अशी प्रवृत्ती सध्या प्रशासनात वाढू लागली आहे, याचा निषेध पत्रकारांकडून करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पत्रकारांनी काळया फिती लावून पालिका आयुक्तांची पत्रकार परिषदेला हजेरी लावावी अशी चर्चा सध्या सुरू आहे.
No comments:
Post a Comment