मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदुषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर ‘मुंबई एअर’ (Mumbai Air App) नावाचे एक विशेष ऍप्लिकेशन विकसित केले आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील ऍपमध्ये दिली आहे. प्रारंभी एण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे ऍप्लिकेशन वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुंबईतील वायू प्रदुषणावर नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपययोजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांना आपल्या भागातील वायू प्रदुषणाची तक्रार मांडण्यासाठीचे डिजिटल माध्यम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पर्यावरण विभागाला दिले होते. त्यानुसार पर्यावरण विभागाने नागरिकांच्या सहज वापरासाठीचे असे मोबाईल ऍप्लिकेशन तसेच संकेतस्थळावर (वेब पोर्टल) उपलब्ध करून दिले आहे. मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या भागातील तक्रारींची मांडणी करणे सहज शक्य आहे. तर महानगरपालिकेच्या विभाग पातळीवर या तक्रारींची दखल घेत तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली. लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मवर देखील हे ऍप उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून गत सहा महिन्यांमधील सर्व तक्रारी पाहता येतील. एखादी नवीन तक्रार दाखल करताना तक्रारीचे स्वरूप, तक्रारीचा तपशील, आपले ठिकाण (लोकेशन), रस्त्याचे नाव, विभागाचे नाव, तक्रारीशी संबंधित छायाचित्र (फोटो) आदी बाबींचा तपशील प्रत्येक नवीन तक्रारीसोबत भरावा लागणार आहे. प्रत्येक तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशीलही मोबाईल ऍपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना पाहता येईल. तक्रार दाखल करतेवेळी वापरकर्त्याला स्वतःचा पत्ता स्वयंचलित (ऑटो फेच) पद्धतीने किंवा स्वतः (मॅन्युअली) दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध राहील.
संकेतस्थळ / वेब पोर्टलच्या माध्यमातून तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी विविध टप्प्यांवर पडताळणीचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये विविध टप्प्यात तक्रारींचा निपटारा करण्यापासून संनियंत्रण करण्यासाठी डॅशबोर्डचा पर्याय देण्यात आला आहे. उपायुक्त, विभागीय पातळीवर सहायक आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी या पातळीवर डॅशबोर्डच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. प्रत्येक तक्रारीचा ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून डॅशबोर्डवर मागोवा (ट्रॅक) घेता येईल. तसेच तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रारींचे वर्गीकरणही डॅशबोर्डवर पाहता येईल.
‘मुंबई एअर’ एप्लिकेशन वापराबाबत -
१. गुगल प्ले स्टोअरवर Mumbai Air ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
२. ऍप इन्स्टॉल करताना सर्व परवानग्यांचा पर्याय क्लिक करा.
३. मोबाईल नंबर साईन इन करण्यासाठी क्लिक करा.
४. ‘एसएमएस’ द्वारे मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) दाखल करा आणि पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रिया पूर्ण करा.
५. युजर प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहितीचा भरणा करा.
No comments:
Post a Comment