मुंबई - सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात ९१० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी केवळ ११ कामे पूर्ण झाली, तर ४ कामे सुरू आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु असतानाच आता दुसऱ्या टप्प्यातील २०० सिमेंटच्या रस्त्यांसाठी सहा हजार ३७३ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तीन ते सहा मीटरच्या लहान रस्त्यांचेही काँक्रीटीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
७८७ कामांना सुरुवात झालेली नाही -
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर ४०० किमीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या आणि जानेवारी २०२३ मध्ये पाच कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली. या कामांपैकी १२३ कामे सुरू झाली असून उर्वरित ७८७ कामांना सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत ११ कामे पूर्ण झाली आहेत. या कंत्राटात शहरातील दक्षिण मुंबईतील काम मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराला देण्यात आले होते. नियोजित वेळेत काम सुरू करण्यात न आल्याने पालिकेने या कंत्राटदाराला ६४ कोटींचा दंड ठोठावून त्याचे कंत्राट रद्द केले.
१,३६२ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या -
त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी गेल्या आठवड्यात १,३६२ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील कामे अपूर्ण असताना दुसऱ्या टप्प्यातील निविदा मागवल्याने पालिकेवर टीका होण्याची शक्यता आहे. अटींनुसार, पावसाळा वगळता कामे पूर्ण होण्यास किमान २४ महिने लागतील. नवीन रस्त्यांची काम ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू होणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निविदांची २ फेब्रुवारीपासून ऑनलाईन विक्री सुरू असून २० फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत निविदा विक्री सुरू राहणार असून त्याच दिवशी अवघ्या एक तासात दुपारी १२ वाजेपर्यंत विक्रीची मुदत आहे.
No comments:
Post a Comment