मुंबई - मुंबई हिंदी पत्रकार संघाला पत्रकार भवनसाठी मुंबईत जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मुंबई हिंदी पत्रकार संघाने वांद्रे मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विश्व हिंदी दिवसाचे औचित्य साधून मुंबई हिंदी पत्रकार संघाच्यावतीने मुंबई, वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ भवन येथे हिंदी सेवा सन्मान व स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाला. त्यानंतर मुंबई हिंदी पत्रकार संघाच्यावतीने सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा, योगायतन ग्रुपचे डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, छत्तीसगड साहित्य परिषदेचे डॉ. राजाराम त्रिपाठी, अमेरिकन महावाणिज्य दूतावास मुंबईचे प्रवक्ते ग्रेस पार्डो, आणि वरिष्ठ पत्रकार सुदर्शना द्विवेदी यांना सन्मानीत करण्यात आले. तसेच ‘संवाद २०२४’ प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, भाजप नेते कृपाशंकर सिंह, खासदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष सिंह, मुंबई हिंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदित्य दुबे, उपाध्यक्ष राजकुमार सिंह, महासचिव विजय सिंह कौशिक यांच्यासह मुंबईभरातील हिंदी भाषिक पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment