मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामधून इम्पेरिकल डाटा गोळा केला जाणार आहे. 23 जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र या
सर्वेक्षणासाठी बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये बौद्धांची नोंद होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे बौद्धांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
बौद्ध म्हणून नोंदणी नाहीच -
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. 23 जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. ही माहिती मोबाईलच्या माध्यमातून एका सॉफ्टवेअरमध्ये गोळा केली जात आहे. घरातील व्यक्तींची माहिती गोळा केली आहे. मात्र अशी माहिती गोळा करत असताना सॉफ्टवेअरमध्ये जातीच्या रकाण्यात बौद्ध म्हणून नोंद करण्याचे ऑप्शन नसल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल -
सर्वेक्षण सुरू असताना एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सॉफ्टवेअरमध्ये जातीच्या रकाण्यात बौद्ध म्हणून ऑप्शन नाही. बौद्ध म्हणून नोंद होणार नाही तो पर्यंत सर्वेक्षण करू नका, असे एक व्यक्ती अधिकाऱ्यांना सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सर्वेक्षण करणारे अधिकारी कर्मचारी त्या व्यक्तीला तुमची जुनी जात म्हणजेच महार म्हणून नोंद करा असे सांगत होते. यावरून बौद्ध म्हणून नोंद करता येत नसेल तर सर्वेक्षण करू नका, तुमचं सर्वेक्षण बंद करा असे या व्यक्तीने अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.
बौद्धांनी सर्व्हेक्षणात भाग घेवू नये -
मराठा जातीच्या आरक्षणासाठी सर्व्हेक्षण होत आहे. यात बौद्धांची बौद्ध म्हणून नोंद होत नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत या सर्वेक्षणात जो पर्यंत बौद्ध म्हणून नोंद होत नाही तो पर्यंत भाग घेवू नये असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment