मुंबई - अंधेरी पूर्व येथे वेरावली - ३ सेवा जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम अविरत आणि अखंडपणे सुरु असून तांत्रिक आव्हानांमुळे त्यास अधिकचा कालावधी लागत आहे. सबब, आज रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ सायंकाळपर्यंत हे दुरुस्ती काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती काम पूर्णत्वास आल्यानंतर जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम, एन आणि एल विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ 1800 मी मी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गुरुवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी गळती सुरु झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. शनिवार, दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून ते रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत दुरूस्ती काम सुरू रहाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या दुरुस्ती कामास तांत्रिक आव्हानामुळे अपेक्षेपेक्षा अधिकचा कालावधी लागत आहे.
प्रकल्प स्थळावरील अडथळ्यांमुळे दुरुस्ती कामाच्या गतीवर परिणाम होतो आहे. तसेच, नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोलीवर असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे. जलवाहिनीमधील पाण्याच्या दाबामुळे पूर्णपणे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागत आहे. जलवाहिनी जवळ असणाऱ्या लूज मातीमुळे काम करताना अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत आज, दिनांक ३ डिसेंबर २०२३ सकाळी पूर्ण होणे शक्य झाले नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा जलवाहिनी दुरुस्तीसाठी अविरतपणे कार्यरत आहे. जलवाहिनी गळतीचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असून आज रविवार सायंकाळपर्यंत काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. दुरुस्ती काम पूर्ण होवून जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यानंतर के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम, एन आणि एल विभागातील बाधित भागात पाणी पुरवठा सुरू केला जाईल. तरी नागरिकांनी महानगरपलिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment