मुंबई - राजकीय पक्षाच्या सभांना, विविध धार्मिक सणाला जाणाऱ्या भाविकांना टोल माफी दिली जाते. त्याचप्रमाणे पुणे कोरेगाव भीमा (Pune Koregaon Bhima) येथे 1 जानेवारीला लाखो अनुयायी विजय स्तंभाला (Vijay Stambha) मानवंदना देण्यासाठी येतात. या लाखो अनुयायांना कोरेगाव भीमा येथे पोहचून मानवंदना देता यावी यासाठी राज्य सरकारने (State Government) टोल (Toll Tax) माफी द्यावी अशी मागणी भीम आर्मी (Bheem Army) या संघटनेकडून करण्यात आली आहे. टोल माफी दिली नाही तर टोल नाके फोडू असा इशारा भीम आर्मी या संघटनेकडून देण्यात आला आहे.
का साजरा केला जातो शौर्य दिन -
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान युद्ध झाले. फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि मराठ्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी बहुतांशीजण महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. या युद्धात 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांना हरवले होते. ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्याकाळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. जेम्स ग्रांट डफ यांनी आपल्या 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज' या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे.
अन्यथा टोल नाके फोडू -
शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रासह देशातून आंबेडकर अनुयायी पुणे भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन हा आता एक राष्ट्रीय उत्सव झालेला आहे. राजकीय सभा, धार्मिक सण तसेच कुंभ मेळा या निमित्त सरकार टोल माफी करतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात शासनाने भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या गाड्यांना टोल माफी करावी अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. टोल माफी दिली नाही तर भीम अनुयायांकडून टोल नाके फोडले जातील याची दक्षता सरकारने घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment