मुंबई - मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद वाढला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. हा वाद जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी मिटविला पाहिजे. महाराष्ट्रात सर्व समाजात सहिष्णुता आहे. वाद होणे योग्य नाही. जरांगे आणि भुजबळ यांनी वाद मिटवावा, अन्यथा मला येऊन त्यांचा वाद मिटवावा लागेल असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी बोलताना, एक काळ असा होता की अनेक जाती स्वतःला मागास मानण्यास आणि आरक्षण मागण्यास तयार होत नसत. मात्र आता आरक्षणाचे महत्व सर्वाना पटत आहे. मराठा समाजाने आता आहे त्या ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण मागू नये. तर ओबीसी मध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून ओबीसी म्हणूनच आरक्षण घ्यावे. मराठा समाजातील ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे अशा गरीब मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हीच मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि त्या मराठा आरक्षण मागणीला आमचा पाठिंबा असल्याचे आठवले म्हणाले.
मी आंबेडकरांचा सच्चा शिष्य -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते. त्याकाळात त्यांनी मी जरी काँग्रेस सोबत युती केली असली तरी मी कणखर आहे. काँग्रेसच्या नदीत ढेकळा सारखे विरघळणार नाही, असे म्हटले होते त्यामुळे मी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा शिष्य आहे. मोदींसोबत असलो तरी माझ्या हाती निळा झेंडा आहे. मी कणखर असून ढेकळासारखा विरघळणार नाही. लोकसभेत आरपीआयचा एकही खासदार नाही तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मला केंद्रीय मंत्री मंडळात घेतले आहे. मी संसदेत जयभीमचा नारा बुलंद केला आहे असे आठवले यावेळी म्हणाले.
शेतकाऱ्यांचे कर्ज माफ केले तसे मागसावर्गीयांचे कर्ज शासनाने माफ करावे अशी मागणी यावेळी आठवले यांनी केली. येत्या 16 डिसेंबर रोजी आयोजित जागतिक धम्मपरीदेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आठवले यांनी केले .
No comments:
Post a Comment