मुंबई - मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात मुंबईतील सर्वात रुंद पादचारी पुलासह पूर्व बाजूच्या डेकचे लोकार्पण करण्यात आले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. कोटक यांनी २०१९ सालापासून या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. हा पूल आणि पूर्वेचा डेक खुला झाल्याने रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे कोटक यांनी यावेळी सांगितले. (Inauguration of Widest Foot Bridge at Ghatkopar Railway Station)
घाटकोपर रेल्वे स्थानकातूनच मुंबईतील घाटकोपर वर्सोवा मेट्रो १ मार्गही सुरू होतो. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास होत होता. याबाबत ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी निवडून आल्यापासून सातत्याने तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर रेल्वे स्थानकातील नवीन पूल आणि पूर्वेकडील डेकच्या निर्मितीचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले होते. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी या कामाचे भूमिपूजन खासदार मनोज कोटक यांच्याच हस्ते पार पडले होते. यानंतर एमआरव्हीसीकडून हे काम २ वर्षात युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.
लोकार्पण करण्यात आलेला नवीन पादचारी पूल १२ मीटर रुंद आणि ७५ मीटर लांबीचा आहे. या पुलाला प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३, ४ वर सीएसएमटी बाजूने सरकते जिने बसवण्यात आले असून पूर्व दिशेलाही सरकत्या जिन्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३, ४ यासह पूर्वेला ३ मीटर रुंदीचे पादचारी जिने उभारण्यात आले आहेत. तर पूर्वेला डेकवरच बुकिंग ऑफिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नवीन पूल आणि पूर्वेतील डेकमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना अतिरिक्त सुविधा मिळाल्या असून त्यांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. आज या पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, घाटकोपरचे आमदार पराग शाह, प्रवीण छेडा, अशोक राय, भालचंद्र शिरसाट, रवी पूज, जे. पी. सिंग, दामू शर्मा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एमआरव्हीसी आणि रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच प्रवासी उपस्थित होते.
प्रवाशांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -
घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना सुविधा मिळाव्यात यासाठी मी निवडून आल्यापासून सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील हा सर्वात रुंद पादचारी पूल आणि पूर्वेतील डेक याचा नक्कीच फायदा होईल. चार नवीन एस्केलेटर्सचाही प्रवाशांना मोठा उपयोग होणार असून भविष्यातही प्रवाशांना सुविधा मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
- मनोज कोटक, खासदार, ईशान्य मुंबई.
No comments:
Post a Comment