मुंबई - मुंबई महापालिकेच्या सर्व मोठ्या रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यांची तपासणी ओपीडी मध्ये केली जाते. या ओपीडी सकाळी लवकर सुरू केल्या जात नसल्याने रुग्णांचे हाल होतात. यासाठी सर्व मोठ्या रुग्णालयामधील ओपीडी सकाळी 8 वाजता सुरू करावी असे आदेश संचालक, मेडिकल एज्युकेशन आणि रुग्णालय यांनी सर्व रुग्णालयांच्या डीन यांना दिले आहेत. तसे परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे. (Hospital OPD starts at 8 AM)
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दिवसाला हजारो तर वर्षाला लाखो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. उपचार करून घेण्यासाठी केसपेपर काढणे, ओपीडी बाहेर लाईन लावून रुग्णांना वाट पहावी लागते. त्यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पहाटेपासून रांगा लावून असतात. त्यानंतरही ओपीडी वेळेवर सुरू होत नसल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागते. याची गंभीर दखल पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. मेडिकल एज्युकेशन आणि रुग्णालय यांच्या संचालक यांनी एक परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक नायर, केईम, सायन, कूपर रुग्णालयाच्या डीन यांना पाठवण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार सर्व रुग्णालयातील ओपीडी सकाळी 8 वाजता सुरू कराव्यात. रुग्ण नोंदणी खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी रुग्णांची नोंदणी सकाळी 7 वाजल्यापासून करावी. सर्व डॉक्टरांनी आत आणि बाहेर जाताना आपली हजेरी बायोमेट्रिक मध्ये करावी. बायोमेट्रिक हजेरी डॉक्टरांच्या पगाराशी सलग्न करावी, सर्व रुग्णालयाच्या डीन यांनी या आदेशाचे पालन करावे, असे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा पालिका आणि आरोग्य विभागाला आहे.
No comments:
Post a Comment