Covid -19 JN.1 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय सुसज्ज ठेवण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2023

Covid -19 JN.1 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय सुसज्ज ठेवण्याचे निर्देश


नागपूर - कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे सांगितले.

कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन 1 या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता नव्याने आलेल्या जेएन 1 या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. 

जेएन 1 व्हेरियंट झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात 3.3 टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण सध्या 27.1 टक्के पर्यंत गेले असून जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. फ्रान्समध्ये 20.1 टक्के, अमेरिका 14.2 टक्के, सिंगापूर 12.4 टक्के, कॅनडा 6.8 टक्के, युनायटेड किंगडम 5.8 टक्के, स्विडन येथे 5 टक्के येवढे आहे. देशात 19 डिसेंबर 2023 पर्यंत 2 हजार 311 रुग्ण आढळले असून केरळमध्ये 2 हजार 41 रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये 15 रुग्णांची नोंद झाली आहेत. तामिळनाडू 14 तर महाराष्ट्रामध्ये 11 रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कोविड तपासणी सुविधेसाठी आरटीपीसीआर मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील पीएसए ऑक्सिजन प्लॉन्ट त्वरित कार्यान्वित करून घ्यावेत. याशिवाय अतिरिक्त दुय्यम व्यवस्था म्हणून जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad