मुंबई - १ जानेवारीला पुणे भीमा कोरेगाव शौर्यदिनी विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. या अनुयायांना बार्टी या संस्थेकडून भोजन दिले जाते. बार्टी ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असल्याने हा विद्यार्थ्यांचा निधी भोजनासाठी वापरू नये अशी मागणी आंबेडकरी संघटनांकडून केली जात आहे. यावर शौर्यदिन साजरा करण्याकरिता महासंचालक बार्टी यांनी निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष विभागाने दिले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार हा निधी देण्यात आल्याची माहिती बार्टी कडून देण्यात आली आहे. (Bhima Koregaon Shaurya Day Food Cost under Day special)
१ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिनी विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. अनुयायांना सालाबादप्रमाणे साधारणत ५० हजार व्यक्तींना शासनाच्या निर्देशानुसार भोजन दिले जाते. त्याकरिता भोजन खर्च हा बार्टीतील यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, फेलोशिप, पीएचडी विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यावेतन निधीच्या योजनेतील नसुन तो २० डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार शौर्यदिन साजरा करण्याकरिता महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी सद्यस्थितीत तातडीची बाब लक्षात घेऊन उपलब्ध करून द्यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष विभागाने दिलेले आहेत.
समाजातील काही पक्ष, संघटनांनी बार्टी मार्फत प्रकाशित करण्यात आलेली भोजन निविदा तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली होती. तथापि भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी देशातील व इतर राज्यातील तसेच मराठवाडा, विदर्भ व संपूर्ण राज्यातून लाखोच्या संख्येने अनुयायी येतात, तसेच २५ डिसेंबर मनुस्मृती दहन महाड, २५ डिसेंबर देहूरोड बुद्ध मूर्ती वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करून सर्व अनुयायी मोठ्या संख्येने १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी येतात. या अनुयायांना भोजनाची व्यवस्था असावी असा आग्रह भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, रिपाईचे अध्यक्ष सतिश गायकवाड, आम्ही सावित्रीच्या लेकी संघटनेच्या रंजना कांबळे, मानसी वानखेडे यांच्यासह आंबेडकरी पक्ष व संघटनांनी बार्टी संस्थेकडे धरलेला आहे.
बार्टी दिनविशेष कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व इतर महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी तसेच महत्त्वपूर्ण दिनी अभिवादन करून महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला जातो. विविध पक्ष संघटनांच्या मागणीनुसार ५० हजार अनुयायांना शौर्यदिनी शासनाच्या निर्देशानुसार भोजन पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment