मुंबई - मुंबईत नेहमीच आगीच्या घटना घडतात. आज (२३ नोव्हेंबर) पहाटे पुन्हा एकदा मुंबईकर नागरिक झोपेत असताना घोडपदेव म्हाडा कॉलनीमधील 3C या २४ मजली इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावर आग लागली. या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाने त्वरित धाव घेवुन १३५ जणांची आगीतून सुखरूप सुटका केली आहे. या आगीत ११ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Fire in Mumbai)
घोडपदेव येथील न्यू हिंद मिल कंपाऊंड मधील म्हाडा कॉलनीमधील 3C या इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावर पहाटे ३.४३ वाजता आग लागली. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक कॅबिन, भंगार सामान, कचरा आदी सामानाला आग लागली. आगीमुळे इमारतीमध्ये धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. एकीकडे आगीवर नियंत्रण मिळवताना दुसरीकडे इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. अखेर सकाळी ७.२० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
१३५ जणांची सुटका, ११ जखमी -
आगीमध्ये इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी पाहिल्या मजल्यापासून अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी आणून १५ व्या रिफ्युजी मजल्यावरून ३० जणांची, २२ व्या रिफ्युजी मजल्यावरून ८० जणांची तर इमारतीच्या गच्चीवरून २५ अशा एकूण १३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत ११ जण धुराची बाधा झाल्याने जखमी झाले आहेत. ११ पैकी ९ जण के ई एम मध्ये, एक जण नायर मध्ये तर एक जण जे जे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment