मुंबई - मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा तब्बल २६ हजार रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या जानेवारी २०२४ पासून कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपये इतका मेडिक्लेम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अद्याप बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मागील वर्षी २२ हजार ५०० इतका बोनस देण्यात आला होता. मागील वर्षी बोनस देताना पालिका कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्षे बोनस मध्ये वाढ होणार नाही असे सांगण्यात आले होते. यामुळे यंदा पुन्हा २२ हजार ५०० इतका बोनस दिला जाईल अशी अपेक्षा होती. दिवाळी तोंडावर आली तरी बोनसची घोषणा केली जात नव्हती. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आरोग्य सेविकांना गेल्या वर्षी ९ हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्यात वाढ करून ११ हजार रुपये इतका बोनस देण्यात येणार आहे. या बोनासमुळे पालिकेला २६० कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेला बैठकीला पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, पालिकेच्या कर्मचारी युनियनचे अशोक जाधव, दिवाकर दळवी, राजाध्यक्ष, संजीवन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पालिका कर्मचाऱ्यांना विमा योजना -
पालिका कर्मचाऱ्यांना विमा दिला जात होता. २०१७ पासून ही विमा योजना बंद झाली होती. ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात होती. येत्या जानेवारी २०२४ पासून ही योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे. याचा फायदा पालिकेच्या एक लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
No comments:
Post a Comment