मुंबई - ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मतदारांचे आभार मानतो. महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने थांबवलेली कामे व थांबवलेले प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना देण्याचे काम आम्ही केले आहे आणि राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण आम्ही आखले आणि तशी भूमिका आम्ही घेतली. म्हणून राज्यातील सर्वसामान्य माणूस मग अगदी शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, महिलांपासून तरुण वर्गापर्यंत, जेष्ठांपासून कामगारांपर्यंत सर्वांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने घराघरात पोहचलेले आहे, हे आपल्या कृतीतून मतदारांनी दाखवून दिले आहे आणि प्रेम व्यक्त केले आहे, असे वक्तव्य करत ग्रामपंचायत निवडणुकीतील निकाल आणि मतदारांनी महायुती सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांमधून महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सरपंच आणि सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. मी मुख्यमंत्री म्हणून आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे सर्व मंत्रिमंडळ यांनी आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये जनतेला लोकाभिमुख न्याय देण्याचे काम केले आहे. म्हणून हा निकाल आपण पाहतो आहे. आमच्या यशामध्ये सर्व समाजाने आम्हाला पाठबळ आणि आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झाले. या आधी महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षाची सुमार कामगिरी जनतेने पहिली. आमचे महायुती सरकार आल्यानंतर दररोज आमच्यावर टोमणे, आरोप-प्रत्यारोप करण्यात संपूर्ण वर्ष घालवले. विरोधकांनी आमच्या सरकारवर टीकाटिप्पणी आरोप केला नाही, असा एकही दिवस गेला नाही. ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, अशा लोकांना जनतेने नाकारले, त्यांना घरी बसवले आणि आमच्या महायुती सरकारला कौल दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी आपल्या मतांनी दाखवून दिले. मतदारांचे आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर विश्वास आहे. म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे, आम्ही आणखी काम करू, आम्ही महाराष्ट्रात आणखी उद्योधंदे आणू, तरुणांना रोजगार आणू, त्यांच्या हाती काम देऊ. ही विकासाची घोडदौड पुढे अशीच सुरु राहणार आहे कारण कामाचा वेग आम्ही वाढवला आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीला असेच यश मिळेल, किंबहुना यामध्ये वाढ होईल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून देऊ आणि मोदी साहेबांचे हात बळकट करू असे मी निश्चितपणे सांगू शकतो.
No comments:
Post a Comment