मुंबई - हवेतील प्रदुषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने रस्ते, पदपथ धुण्याच्या कार्यवाहीला वेग दिला आहे. आज रविवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ किलोमीटर लांबीचे रस्ते एकूण २४ टँकरमधील पाण्याचा वापर करून जेट मशीन, फायर एक्स व अन्य यंत्रणेद्वारे धूळमुक्त करण्यात आले. मुंबईतील २४ विभागांमधील ज्या विभागात हवा गुणवत्ता निर्देशांक अधिक निदर्शनास आला आहे, त्या ठिकाणी मिस्टिंग मशीनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात येत आहे तर, धुळीचे प्रमाण अत्याधिक असलेल्या रस्त्यांवर ब्रशिंग करून त्या ठिकाणी जेट मशीनद्वारे पाणी फवारण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या विविध विभागांनी धूळ नियंत्रण करण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईतील २४ विभागीय कार्यालयातील विविध रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण (धूलिकण) कमी करण्याकरिता तसेच हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधार करण्यासाठी, धुळीचे प्रमाण अत्याधिक असलेल्या ठिकाणी विविध वाहनांद्वारे, संयंत्राद्वारे पाण्याची फवारणी करण्यात येत आहे.
सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. एकूण ३५७ रस्ते व ६७६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. याकरिता दैनंदिन एकूण १२१ टँकरद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. महानगरपालिकेच्या स्लज डिवॉटरींग (१७), फायरेक्स टँकर (७), सूक्ष्मजल फवारणी यंत्र (५) (Mist-Blowing) यांचादेखील वापर केला जात आहे. या कार्यवाहीसाठी विविध पुनर्वापर प्रक्रियेद्वारे उपलब्ध तसेच स्थानिक जलस्रोत जसे की तलाव, विहिरी, कूपनलिका यामधून उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात येत आहे.
मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून शुक्रवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण ४५ किलोमीटर तर शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण ५५ किलोमीटर परिक्षेत्रात पाणी फवारणी करण्यात आली होती. आज रविवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ किलोमीटर लांबीच्या परिक्षेत्रात पाणी फवारणी करण्यात आली आहे. म्हणजेच तीन दिवसात सुमारे १५४ किलोमीटर अंतराचे रस्ते धूळ मुक्त करण्यात आले आहेत.
शहर विभागातील डॉ. ऍनी बेझंट मार्ग, खान अब्दुल खान गफार मार्ग, पेडर रोड, कफ परेड, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मैदानाजवळील परिसर, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गालगतचे रस्ते, पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्गवरील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळालगतचे रस्ते, पदपथ, मुंबई मेट्रो मार्गिकेच्या आजूबाजूचे रस्ते आदी ठिकाणावर महानगरपालिकेच्या मिस्टिंग मशीन्सद्वारे, फायर-एक्स / वॉटर टँकरद्वारे आणि अन्य वाहनांद्वारे पाणी फवारणी करण्यात आली.
या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधार करण्यासाठी धूळ नियंत्रण प्रणाली व हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ३० स्मोक गनचा वापर करण्याचे नियोजन आहे. मुंबईतील विविध बांधकामांना हवा गुणवत्ता नियंत्रण यंत्रे, ३० फुट उंचीपर्यंत पत्रे लावणे, बांधकाम व पाड कामाचा राडारोडा ने-आण करतांना आवश्यक त्या उपाययोजना करणे, इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत, जेणेकरून वायू प्रदूषण नियंत्रणात राहील. वायू प्रदूषण अधिनियम, १९८१ नुसार, विविध बांधकामांवरील आस्थापनांना पूर्वसूचना (intimation) देऊन, सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्या संबंधी कळवण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत ठोस पावले उचलली नसल्यास यथोचित कार्यवाहीसंबंधी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment