आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2023

आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय - मुख्यमंत्री


रत्नागिरी / मुंबई - सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फीत कापून आणि कोनशिला अनावरण करुन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन 'नमो ११ सुत्री' कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शिरगाव सरपंच फरिदा काझी, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिलेला शब्द पूर्ण करणं, वचनपूर्ती करणं आणि वेळेत पूर्ण करणं याचं ज्वलंत उदाहरण आजचे लोकार्पण आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा शुभारंभ होत आहे. ४३० खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील ४०० ठिकाणी झाली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं, सर्वसामान्यांच्या मनातलं गतिमान सरकार आहे, हे याचं उदाहरण पाहतोय. आम्ही जनतेशी बांधील आहोत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे. आरोग्य विभागावर फोकस केला आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम ५ लाखांवर वाढविली आहे. योजना वाटणारं, योजना देणारं सरकार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला ११८ कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मधून १६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, मायबाप बळीराजाने चिंता करु नये. बळीराजाला वाऱ्यावर सोडणारं नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द आहे. 'नमो ११ सुत्री' कार्यक्रम सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षांची मागणी या महाविद्यालयामुळे पूर्ण झाली आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कष्ट केले. भविष्यात टप्प्या-टप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस आहे. बीएससी नर्सिंग महाविद्यालय देखील या महाविद्यालयात सुरु केले जाईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी भरतीचा शासन निर्णय काढूनच मी आज येथे आलो आहे. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले, नवीन सरकार स्थापन झाले. गोव्यात असताना मुख्यमंत्री महोदयांनी कुठचं काम करायंच, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अनेक वर्षांपासून मागणी असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी मी बोललो. सकाळी ७ वाजता मुख्यमंत्री महोदयांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना फोन लावून मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्यास सांगितले. त्यासाठी ५२२ कोटी रुपये मंजूरही केले. पुणे, मुंबईनंतर रत्नागिरीला परिपूर्ण एज्युकेशन हब बनविण्यासाठी मेडीकल कॉलेज देखील दिलं. उद्योजकांना १०० टक्के इनसेन्टीव्ह देण्याचा निर्णय देखील काल घेतला. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले मुख्यमंत्री असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिंह यांनी तर, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आभार प्रदर्शन केले.

दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ -
वसंत घाणेकर, संजय पावसकर यांना घरकुल योजनेसाठी ६ लाख ८० हजार निधी वितरीत करण्यात आला. दिनेश शितप व मुक्ता शिरसाठ, सुरज अवसरे व सोनाली जाधव यांना दिव्यांग-दिव्यांग विवाह योजनेत ५ लाख निधी वितरीत करण्यात आला. अंकिता कोलगे, संदीप कांबळे, भारती भायजे, संतोष रहाटे यांना स्वयंचलित तीन चाकी सायकली वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील १४ विद्यार्थ्यांना व्हिल चेअर, सीपी चेअरचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील २ हजार ४४३ सीआरपींना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात ६ महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल वाटप करण्यात आले. 'नमो शेततळी' अभियानांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad