मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Mumbai Bank) धारावी शाखेचे होत असलेले उदघाटन बँकेच्या वाटचालीतील एक महत्वपूर्ण आणि गौरवशाली बाब आहे. राज्यातील उत्तम सहकारी बँक म्हणून मुंबई जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे, असे गौरवोदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढले. मुंबई बँकेच्या धारावी शाखेचा आज उदघाटन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ऑनलाईन बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक संकटे, अडचणीना सामोरे जाऊन सहकार क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून ही बँक उभी आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यासाठी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि बँकेची संपूर्ण टीम यांचे विशेष अभिनंदन करतो. बँकेने आर्थिक, तसेच सहकार चळवळीबरोबरच सामाजिक बांधिलकी विविध उपक्रमातून जपली आहे. मुंबई पोलिसांना शासनामार्फत घरे देण्यात येणार असून त्यासाठी मुंबई बँकेकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबईत माथाडी कामगारांना कोणत्याही बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येत नव्हते अशावेळी त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मुंबई बँकेने जवळपास सोळाशे माथाडी कामगारांना कमी व्याज दरात घरकर्ज देऊन दाखवलेली सामाजिक बांधिलकी अजोड आहे. आजही बँकेने सामाजिक बांधिलकीतून धारावी सारख्या झोपडपट्टी भागात बँकेची शाखा सुरू केली आहे. कर्तव्य, निष्ठा आणि सामाजिक जाणीवेतून बँक उत्तरोत्तर प्रगती करत राहील असा मला विश्वास वाटतो, असेही फडणवीस यांनी म्हटले.
तर यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले की, धारावीसारख्या ठिकाणी जिथे कष्टकरी, घाम गळणारे लोकं मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा लोकांसाठी प्रमुख रस्त्यावर बँक हवी या भावनेतून आज या बँकेचे लोकार्पण होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बँकेच्या वाटचालीत एक आधारवड म्हणून मोलाचा वाटा आहे. तो आम्ही कधीही विसरू शकत नाही. केवळ नैतिक अधिकार, पाठबळ नाही तर बँकेचे आर्थिक स्थेर्य राहिले पाहिजे यासाठी शासनाच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत त्यांनी या बँकेला केली आहे. ही बँक सर्वसामान्यांची, कष्टकऱ्यांची बँक आहे. मुंबईत जेव्हा जेव्हा या कष्टकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली तेव्हा कुठलीही बँक उभी राहिली नाही. यावेळी दरेकर यांनी गिरणी कामगार, माथाडी कामगार, पोलिसांच्या घरांसाठी मुंबई बँकेने कर्जाची मदत केल्याचेही सांगितले. तसेच जेव्हा जेव्हा या राज्यावर, देशावर संकटे आली, शहीद बांधवांच्या कुटुंबियांना सामाजिक बांधिलकीतून याच बँकेने मदत केली. निसर्ग, तौकते वादळ आले त्यावेळी कोट्यावधीची मदत मुंबई बँकेने केली. आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने केल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, ज्यावेळेला अर्बन बँकांचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी सावंतवाडी बँक अडचणीत आली. राज्यातील बँका कशा बंद पडताहेत, ५०० पैकी २५० बँकांना टाळे लावावे लागेल अशी परिस्थिती आहे. राज्य सरकार म्हणून पुढाकार घेऊन ह्या बँका जगवल्या पाहिजेत, त्यांना ताकद दिली पाहिजे ही भुमिका मी मंत्री केसरकर यांच्याकडे मांडली. ते सहकार मंत्र्यांशी बोलले. त्यानंतर ह्या सरकारने बैठक घेतली त्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने अडचणीत असलेल्या अर्बन बँकांना २०० ते ३०० कोटी रुपये देण्याची मानसिकता या महायुती सरकारने दाखवली. त्यासाठी एक समिती गठीत केली असून एका महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे. सर्वसामान्यांची जाण असेल तर राज्यकर्ता निर्णय कसे घेतो ते केसरकर यांच्या कामातून आम्ही पाहिले आहे. जिल्हा बँक राज्य सरकारच्या यादीवर नव्हती असे प्रशासनाने सांगितले त्यावेळी फडणवीस, केसरकर यांच्याशी बोलून मागील मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई बँकेला राज्याच्या मान्यता प्राप्त यादीवर घेतले गेले. त्यामुळे शिक्षकांचे पगार येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
या प्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, विधानपरिषद आमदार आणि संचालक प्रसाद लाड, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, संचालक नितीन बनकर यांच्यासह बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment