मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने, जाळपोळ सुरू आहे. या आंदोलनामुळे (Maratha andolan) राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान (12 crores loss) झालंय. या प्रकरणी महाराष्ट्रात आतापर्यंत १४१ गुन्हे दाखल असून १६८ अटक आरोपी आहेत (141 cases filed, 168 arrests) तर १४६ आरोपींना ४१ अ नुसार नोटीस पाठवण्यात आलीये. बीड, संभाजी नगर ग्रामीण आणि जालन्यात इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.
मराठा आक्रमक -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. यावर सरकारला ४० दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी संपला तरी सरकारने आरक्षणाची घोषणा केली नसल्याने मराठा आक्रमक झाला. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. राज्यात सर्वत्र याचे पडसाद उमटले. आरक्षणाच्या मागणीसाठी काही ठिकाणी शांततेत आंदोलनं झाली तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. या हिंसक आंदोलनामुळे संभाजी नगरमध्ये ५४ गुन्हे आणि १०६ आरोपी अटकेत आहेत तर बीडमध्ये जमावबंदीचे आदेश दिलेत. बीडमध्ये २० गुन्हे दाखल झाले असून यामध्ये ३०७ आयपीसीनुसार ७ गुन्हे दाखल झालेत.
सरकारने काय केलं -
दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला आहे. कागदपत्रे आणि निजाम काळातील नोंदी तपासून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment