मुंबई - दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, यंदाच्या दीपावलीत रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत. आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी अतिशय उत्साहात आपण सारेजण दीपावली सण साजरा करतो. या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. दीपावली सणामध्ये रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडण्याचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे, तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
फटाके फोडताना घ्यावयाची काळजी -
१. फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
२. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडतांना मोठ्या व्यक्तिंनी सोबत रहावे.
३. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
४. फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
५. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा.
फटाके फोडताना पुढील बाबी टाळाव्यात -
१. इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.
२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.
३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
५. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
६. इमारतीला रोशणाई करतांना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये, सैल जोडणी टाळावी.
No comments:
Post a Comment