मुंबई - चेंबूरमध्ये वत्सलाताई नाईक नगर येथील हॉटेल ईस्टर्न प्लाझामध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कार्यवाही काल (दिनांक २९ नोव्हेंबर २०२३) करण्यात आली. नेहरू नगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेऊन ‘एम’ पश्चिम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (Action on unauthorized construction of Hotel Eastern Plaza)
चेंबूर येथे पूर्व द्रुतगती मार्गाजवळ वत्सलाताई नाईक नगरमध्ये ईस्टर्न प्लाझा हॉटेल असून त्याचे तळमजला अधिक दोन मजले इतके बांधकाम होते. मात्र, कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता या हॉटेलच्या इमारतीवर ए. सी. शीट रुफ, बी. एम. वॉल आणि लादी कोबा स्लॅबचा वापर करून १४ फूटपेक्षा अधिक उंचीचे अनधिकृत लॉज बांधकाम करण्यात आले होते. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अग्निशमन उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानुसार, ही बांधकाम निष्कासनाची कारवाई झाली. हॉटेल ईस्टर्न प्लाझाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुमारे ८० टक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. सायंकाळी काळोख दाटल्याने थांबवण्यात आलेली उर्वरित कारवाई आज (दिनांक ३० नोव्हेंबर २०२३) पूर्ण केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि सहायक आयुक्त (‘एम’ पश्चिम विभाग) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशीत अधिकारी यांनी ही कारवाई केली. ‘एम’ पश्चिम विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून ३० मनुष्यबळ तसेच अन्य आवश्यक संसाधनांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. यासोबतच नेहरू नगर पोलिस स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईप्रसंगी बंदोबस्त स्वरूपात तैनात होते.
No comments:
Post a Comment