मुंबई - रावणही शिवभक्त होता, तरीही रामाला त्याला मारावे लागले. कारण रावण माजला होता. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न झाला. आपला धनुष्यबाणही चोरला. पण आपल्याकडे मशाल आहे. मारुतीरायाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशी येणा-या निवडणुकीत या गद्दारांची खोक्यांची लंका दहन करणार म्हणजे करणार, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
मागच्या वर्षी शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. आज ठाकरे गटाचा नेहमीप्राणेच शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला. शिवाजी पार्क येथे झालेल्या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर व प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलर, मुसोलिनी आदी कुख्यात हुकूमशहांशी तुलना करताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफानी टीका केली. २०१४ ला आम्ही मोदींना वेड्यासारखा पाठिंबा दिला होता. पण नंतर भाजपाचा सत्तांध, पाशवी चेहरा समोर आला असे ठाकरे म्हणाले.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समजूतदारपणे आंदोलन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देताना भाजपापासून सावध राहा, असा इशाराही त्यांनी दिला. आरक्षण नक्की मिळेल पण माझी हात जोडून विनंती आहे की, भावांनो आत्महत्या करू नका. आरक्षण नक्की मिळेल, पण तेव्हा तुम्ही नसाल तर तुमच्या कुटुंबाचे रक्षण कोण करेल, असा सवालही त्यांनी केला.
बंडखोर शिवसेना आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर वर्ष झाले तरी निर्णय होत नसल्याने सर्वोच्च न्यायालय व विधानसभा अध्यक्षांवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. लवादाची तारीख पे तारीख सुरू राहू देत. सरकारमध्ये हिंमत असेल तर मुंबई महापालिकेसह लोकसभा, विधानसभा निवडणुका पण घेऊन दाखवा. जनता जो निकाल देईल तो देईल, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटावर, नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर घणाघाती टीका केली. मेळावा झाल्यानंतर आपण खोकासुराचे दहन करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment