विरोधी पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2023

विरोधी पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर


नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. भाजप आगामी निवडणुकीसाठी हे सर्व करत आहे, असे ते आरोप करत आहेत. इंडिया आघाडीचे १० हुन अधिक नेते ईडीच्या रडारवर आहेत. विशेष म्हणजे पक्षातील क्रमांक दोनच्या नेत्यांचा या लिस्टमध्ये समावेश आहे. तसेच काँग्रेसच्याही बड्या नेत्यांचा यात समावेश आहे.

मेनस्ट्रीम मीडियासह स्वतंत्र पत्रकारिताला धोका निर्माण झाला आहे. अनेक जणांनी सरकारच्या वाढत्या प्रभावाला कंटाळून स्वतंत्र पत्रकारिता सुरु केली, पण सरकारविरोधात बोलल्याने त्यांनाही अटक किंवा चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. इंडिया आघाडीचा आरोप आहे की, भाजपला निवडणुकीपूर्वी मोठ्या विरोधी नेत्यांना तुरुंगात ठेवून निवडणुका जिंकायच्या आहेत. तसेच अनेक विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे की, ईडी लोकांना निवडणुकीपूर्वी अटक करत आहे जेणेकरून त्यांना निवडणुकीपर्यंत जामीन मिळू नये. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकूनही भाजप आपली डिपॉझिट वाचवू शकणार नाही, असे इंडिया आघाडीचे म्हणणे आहे.

शिक्षण भरती घोटाळ्यात ईडीला अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करायची आहे. अभिषेक हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अध्यक्षानंतरचे त्यांचे सर्वात शक्तिशाली पद आहे. ईडी राजकीय हेतूने नोटीस पाठवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ईडीला हेमंत सोरेन यांचीही चौकशी करायची आहे. ईडीने आतापर्यंत सोरेन यांच्या चौकशीसाठी ५ समन्स जारी केले आहेत. सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. पत्रा चाळ घोटाळ्यातही विशेष न्यायालयाने राऊत यांना जामीन मंजूर करताना ईडीवर ताशेरे ओढले होते. अलीकडेच लालू कुटुंबीयांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातून जामीन मिळाला आहे.

रडारावरील प्रमुख नावे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. तसेच राज्य काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा यात समावेश आहे. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी, शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील (शरद पवार) ही प्रमुख नावे आहेत.

व्यवस्थापनाचीही जबाबदारी
लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीची कारवाई ज्या प्रकारे तीव्र झाली आहे, त्यामुळे विरोधी पक्षांचाही तणाव वाढला आहे. कारण, ईडीच्या रडारवर असलेले बहुतांश विरोधी नेते त्यांच्या पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनाचीही जबाबदारी सांभाळतात आणि पक्षाचे प्रमुख चेहरे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad