मुंबई - टोलदरवाढीच्या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. आपल्या ‘लाव रे तो’ व्हिडीओच्या माध्यमातून टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय-काय आश्वासने दिली गेली आणि त्याचे पुढे काय झाले? या सर्वाचा लेखाजोखा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडला आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, टोलनाके बंद केले नाहीतर टोलनाके जाळून टाकू असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलताना म्हणाले की, ‘ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली, त्याविरोधात मनसे आमदार अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मी कालही याबाबत बोललो होतो, पण मुद्दाम आज पुन्हा सांगतोय. मला यासंदर्भात राज्य सरकारकडून एक पत्र आलं, त्या पत्रात एक स्तंभ होता. त्यात कोणत्या वाहानांना टोल आहे आणि कोणत्या वाहानांना टोल नाही, हे नमूद करण्यात आले होते. साधारणत: २०१० मध्ये टोल आंदोलन सुरू झाले. टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, याचे होते काय? त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?
मनसेच्या टोलच्या आंदोलनानंतर त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचे सरकार होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती. आता काय आहे? हे कोणालाच माहिती नाही. पण त्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय म्हणालेले, हे काही क्लिपमधून पाहुयात, असे म्हणत राज ठाकरेंनी एक-एक मिनिटांच्या क्लिप भर पत्रकार परिषदेत दाखवल्या. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या टोलनाक्यासंदर्भातील क्लिप दाखवल्या. मनसेने आंदोलन करुन अधिकृत आणि अनधिकृत असे ६७ टोलनाके बंद केले होते. अजित पवार व्हिडीओमध्ये ज्या ४४ टोलनाक्यांबाबत बोलत आहेत, ते मनसने त्यांच्यावर दबाव टाकून बंद करायला लावले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
टोलदरवाढीच्या मुद्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्यावरून धांदात खोटे बोलत आहेत, असे सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, टोलचे पैसे नेमके जातात कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असे वाटते याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येते ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाही, तर आमची माणसे प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू असा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment