मुंबई - धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला. आधुनिक भारत या पायावर उभा आहे. त्यांची शिकवण जगाला सुद्धा मार्गदर्शक आहे. डॉ बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज हे स्थान जगासाठी ऊर्जा स्थान ठरले आहे. इथे लाखो नागरिक, अनुयायी भेट असतात. म्हणून या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे २०० कोटींचा विकास आराखड्याला मान्यता दिल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे.
No comments:
Post a Comment