कुर्ला, अंधेरीत पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 October 2023

कुर्ला, अंधेरीत पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्च‍िम आण‍ि एल व‍िभागातील अत‍िक्रमण धारकांवर अत‍िक्रमण न‍िर्मूलन पथकाने धडक कारवाई केली. रस्ते वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना दंड ठोठावण्यात आला, तसेच कारवाई झालेल्या जागी पुन्हा अत‍िक्रमण होवू नये म्हणून या पर‍िसरावर पथकाकडून सतत पाळत ठेवली जाणार आहे. या कारवाईमुळे चांदिवली येथील नाहर इस्टेट, डी मार्ट, तसेच मुंबई अग्न‍िशमन उप केंद्रालगतचा पर‍िसर अत‍िक्रमणमुक्त झाला. त्यासोबतच, के पश्चिम व‍िभागा‍त जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम) येथील परिसरातही अत‍िक्रमणावर कारवाई करण्यात आली.

मुंबई महानगरातील रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांपासून मुक्त रहावेत, त्यावर अत‍िक्रमण होवू नये, पादचाऱ्यांना चालणे सोयीचे व्हावे, यासाठी महानगरपाल‍िका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अत‍िर‍िक्त महानगरपाल‍िका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे (पश्च‍िम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणधारक व फेरीवाले यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाते. उप आयुक्त (व‍िशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे, उप आयुक्त (पर‍िमंडळ ४) व‍िश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हर्लेकर, सहायक आयुक्त (के पश्च‍िम) डॉ. पृथ्वीराज चौहान, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे यांच्या निर्देशानुसार तसेच अनुज्ञापन अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) पथकाने नाहर इस्टेट, डीमार्ट, तसेच मुंबई अग्न‍िशमन उपकेंद्रालगतचे खाद्यपदार्थ व‍िक्रेते, अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली.

अत‍िक्रमण निर्मूलन कारवाई सुरू होताच फेरीवाल्यांचे प्रतिनिधी महानगरपाल‍िकेच्या वाहनाचा पाठलाग करुन त्यांची माहिती पुढील पर‍िसरात बसलेल्या फेरीवाल्यांना पुरव‍ित होते. हे निदर्शनास येताच अत‍िक्रमण पथकाने त्या व्यक्तींना चकवा देत कारवाई केली. या पथकाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करुन फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) उपविभागातील अनुज्ञापन निरीक्षक मनीषा हांडे, जॉन्सन, राजेश गवई, मन्सूर सय्यद व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.

के पश्चिम व‍िभागा‍त अंधेरी (पश्चिम) येथील जे. पी. मार्ग येथील परिसरातही अत‍िक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्‍त डॉ. पृथ्‍वीराज चौहान यांच्‍या आदेशान्‍वये तसेच अनुज्ञापन अधीक्षक प्रकाश जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्‍ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) राजन गावडे यांच्‍या उपस्थितीत के पश्चिम विभाग कार्यक्षेत्रात जे. पी. मार्ग परिसरातील भाजी विक्रेते, फळविक्रेते व इतर असे मिळून एकूण ६८ अनधिकृत फेरीवाल्‍यांवर कारवाई करून हा परिसर अनधिकृत फेरीवाला मुक्‍त करण्‍यात आला. तसेच संबंधित ठिकाणी पुन्हा अत‍िक्रमण होवू नये म्हणून निगराणी ठेवली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad