मुंबई - आज आझाद शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होत आहे. एकेकाळी मी देखील दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे विचार मैदानात बसून ऐकायचो. त्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है चा नारा दिला आणि संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट पसरली, हिंदुत्वाचा जयघोष पसरला. तो विचार आजतागायत मी प्राणपणाने सोडला नाही. सत्तेवर लाथ मारली, खुर्ची सोडली पण बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मागील वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करू शकलो असतो. पण राज्यात सुखशांती, शांतता असावी म्हणून आपण दसरा मेळावा बिकेसी येथे केला आणि आज आझाद मैदानात दसरा मेळावा आयोजित केला आहे. आमच्यासाठी मैदान नाही तर बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत. जिथे खुलेआम विचार बिनधास्तपणे मांडता येतात, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केले.
शिवसेनेतर्फे मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, संजय राठोड, शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, एकीकडे बाळासाहेबांचे ज्वलंत विचार आपण पाहत आहोत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात लाचारी सुरू आहे. ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी वाभाडे काढले, ज्यांना कधीही बाळासाहेबांनी जवळ उभे सुद्धा केले नाही, अशा भ्रष्टाचाऱ्यांचे गोडवे आज गायले जात आहेत. ज्याने सावरकरांचा अपमान केला, ज्या मणिशंकर अय्यरला बाळासाहेबांनी जोडे मारले, त्या काँग्रेसचे जोडे आज हे उचलत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना यांनी कधीच मूठमाती दिली आहे. हे आम्हाला एक फुल दोन हाफ म्हणून हिणवतात, पण हे कधी आपल्या पक्षाला एक फुल एक हाफ करून काँग्रेसमध्ये विलीन करतील काही सांगता येत नाही. ज्या शिवतीर्थावरून गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी दिला, त्याच शिवतीर्थावर गर्व से कहो हम काँग्रेसी है, गर्व से कहो हम समाजवादी है, हम हिंदुत्वविरोधी है, हा नारा दिला जात आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर यांनी खुपसला. हिंदुत्वाशी बेईमानी केली, गद्दारी केली. आज हे आम्हाला इंडिया आघाडीच्या जीवावर गाडण्याची भाषा करत आहेत. पण ज्याप्रकारे विजयादशमी दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते, त्याच प्रकारे या आघाडीरुपी 10 तोंडी रावणाला 2024 च्या निवडणुकीत आम्ही गाडून टाकणार आहोत.
बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना नाकारले त्यांचे तळवे चाटण्याचे काम हे करत आहेत. यांना शिवसैनिकांशी काही घेणे देणे नाही. शिवसैनिक जगला काय, मेला काय यांना त्याचे काही घेणेदेणे नाही. आज हे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून काँग्रेसला, समाजवादीला जवळ करत आहेत, उद्या हे एमआयएम ला सुद्धा कडेवर घेतील, त्यांच्याशी युती करतील. यांचा काही भरोसा नाही. त्यामुळे महागद्दार कोण हे ओळ्खण्या इतकी जनता सुज्ञ आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे उबाठा पक्षाचे वाभाडे काढले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मला सत्तेची लालसा नाही तर राज्याचा आणि जनतेचा विकास हेच माझे धेय्य आहे. मी स्वतःला एक मुख्यमंत्री नाही तर एक सर्वसामान्य शिवसैनिक समजतो आणि संपूर्ण महाराष्ट्र हा माझा परिवार समजतो. आपल्या सरकारमध्ये अनेक रखडलेल्या योजना, अनेक नवीन प्रकल्प वयोजना आपण सुरू केल्या. काही प्रगतीपथावर आहेत. अनेक प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. आज मराठा आरक्षणाचा देखील प्रश्न उद्भवला आहे. पण मी सांगू इच्छितो की शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत, इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण आम्ही देणारच हा माझा शब्द आहे.
No comments:
Post a Comment