मुंबई - उबाठा गटाकडून मंत्री दादाजी भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे 'अंधारा'त तीर मारण्याचा प्रयत्न असल्याचे मत शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर उबाठा गटाने केलेल्या बेछूट आरोपांना शीतल म्हात्रे यांनी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कोणताही ठोस पुरावा नसताना केलेले हे आरोप म्हणजे आकस बाळगून बदनामी करण्याचा कट असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
दादाजी भुसे हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले सच्चे शिवसैनिक असून त्यांना बदनाम करून त्यांना मुद्दाम चुकीच्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे असून स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून असे विश्वप्रवक्त्यांचे उद्योग असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दादाजी भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा करून मालेगावमधील सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा असाच बेछूट आरोप केला होता. याबाबत दादाजी भुसे यांनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याचा सुनावणीवेळी संजय राऊत यांनी कोर्टात हजर राहण्याचे टाळले, एवढेच नाही तर एकही लेखी पुरावा ते कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत त्यामुळे कोर्टाने त्याना 23 ऑक्टोबर रोजी मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र याचा त्याना विसर पडला आहे उलट त्यांच्यावर ही नामुष्की ओढावल्याने आकस बाळगून त्यांनी दादाजी भुसे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याला मदत केल्याचे निराधार आरोप केला आहे असे शीतल म्हात्रे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
संजय राऊत यांचे हात खिचडी घोटाळ्यात बरबटलेले -
संजय राऊत याना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोक्यातील कुसळ दिसते असा आरोप म्हात्रे यांनी केला. सध्या सूरु असलेल्या खिचडी घोटाळ्याचा चौकशीमध्ये राऊत यांचे कुटूंबीय तसेच त्यांच्या जवळच्या व्यक्ती गुंतलेल्या असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोना काळात रुग्णांना 300 ग्राम खिचडी देण्याचे कंत्राट राऊत यांचे निकटवर्तीय बाळा कदम यांना मिळाले होते मात्र त्यांनी ईडीकडे नोंदवलेल्या जबाबात 100 किलोची 1000 पाकीटे बनवून वितरित केल्याचे सांगितले आहे. म्हणजे 300 ऐवजी 100 ग्रॅम खिचडी रुग्णांना देण्यात आली असून त्यातून राऊत कुटूंबातील विदिशा राऊत ( संजय राऊत यांची मुलगी) हिला 12 लाख 75 हजार रुपये, संदीप राऊत (संजय राऊत यांचे बंधू) याना 6 लाख 25 हजार रुपये तर सुजित पाटकर (संजय राऊत यांचे पार्टनर) याना 41 लाख 80 हजार रुपये दिल्याचे आपल्या जबानीत सांगितले आहे. याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली.
बॉडी बॅग घोटाळ्यात उबाठा गटाच्या किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप -
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या बॉडी बॅग्ज वेदांत इन्फोटेक याच कंपनीकडून 6 हजार 719 रुपयांना खरेदी करण्यासाठी उप-अधिष्ठाता राठोड याना आपल्या घरी बोलवून तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी निर्देश दिल्याचे राठोड यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ही बॉडी बॅग ठाणे मनपाने 325 रुपयांना खरेदी केली होती. मग एवढ्या महाग बॉडी बॅग खरेदी करून मृतांच्या टाळूवरचे लोणी कुणी खाल्ले याचे उत्तर राऊत यांनी द्यावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली.
लाईफलाईन घोटाळ्यातही राऊतांचे निकटवर्तीय लाभार्थी -
कोरोना काळात मुंबईतील ज्या लाईफलाईन हॉस्पिटलला कोरोना केंद्र सुरू करण्याबाबत 19 मार्च 2020 साली ऑफर लेटर देण्यात आले. मात्र सुजित पाटकर यांनी केलेल्या पार्टनरशिप डिड ही 28 जून 2020 ही तारीख आहे म्हणजे एखादी कंपनी सुरू होण्यापूर्वीच तिला काम देण्यात आले. त्याबदल्यात सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे, कुणी आणली कुठून आणली यावर देखील संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी सौ. शीतल म्हात्रे यांनी केली.
ज्या दादाजी भुसे यांच्या ललित पाटील प्रकरणाशी सुतराम संबंध नाही. त्यांनी स्वतः याबाबत माझे नव्हे माझे निकटवर्तीय आणि माझ्या कुटूंबियाचे मोबाईल फोनचे तपशील तपासावे असे जाहीर आव्हान दिले आहे. उबाठा गटाचे देशातील एकाही तपासयंत्रणेवर विश्वास नसल्याने आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास करून घ्यावा असे जाहीर आव्हान दिले असल्याने उबाठा गटाने आधी त्यांच्याजवळ असलेले पुरावे सादर करावेत अन्यथा थुकूरट प्रवक्त्याकडून 'अंधारा'त तीर मारणे बंद करावे असे आव्हान शीतल म्हात्रे यांनी दिले आहे. तसेच उगाच खोटेनाटे आरोप करून संभ्रम निर्माण करण्यापेक्षा स्वतः केलेल्या घोटाळ्याबद्दल आधी जनतेकडे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment