मुंबई - मुंबईतील हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत आज (दिनांक २३ ऑक्टोबर २०२३) मिस्ट मशीन्सचा वापर करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सूक्ष्म जल फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे श्रीमंत वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात सूक्ष्म जल फवारणी करण्यात आली आहे.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व संस्था, संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच घेतली होती. मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले होते.
त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईतील धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी वाहनावर बसविलेल्या मिस्ट मशीन्सचा वापर करून वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर आदी परिसरात हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फवारणी करण्यात आली. मुंबई शहर, उपनगर आदी भागांमध्येही तुषार फवारणीसोबत अन्य उपाययोजनांही प्रशासनाकडून हाती घेण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment