शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या - नाना पटोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2023

शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या - नाना पटोले


मुंबई - राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी तसेच राज्यपाल महोदयांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन सरकार बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, CWC सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयातून याची सुरुवात झाली. औषधे नाहित, डॉक्टर नाहित, वैद्यकीय कर्मचारी नाहीत अशा असुविधांमुळे हे मृत्यू झाले आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागात ७२ नवजात बालके होती व त्यासाठी केवळ तीन नर्स होत्या, ही अवस्था आहे राज्याच्या आरोग्य विभागाची. सरकार आरोग्य विभागातील रिक्त जागा भरत नाही, औषध खरेदी करत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने १३ हजार कोटी रुपयांची तुट दाखवली होती तर पावसाळी अधिवेशनात ४० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करुन घेतल्या. सरकार जनतेला आरोग्य सेवा देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही तर मग हा पैसा जातो कुठे? असा संतप्त पटोले यांनी केला.

राज्यातील येड्याचे सरकार दिवाळखोर आहे, जनतेच्या घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो त्याची सरकार उधळपट्टी करत आहे, सर्वसामान्यांच्या रक्ताने या सरकारचे हात माखलेले आहेत, त्यांनी सरकारी रुग्णालयात सर्वसामान्य जनतेचे खून केले आहेत. बधिर झालेले, भ्रष्टाचारी, लुटारू, शेतकरी विरोधी, तरुणांविरोधातील, गरिबांच्या विरोधातील या सरकारवर राज्यपालांनी कारवाई करावी व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली असून स्वतः या प्रकरणात लक्ष घालतो असे आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad