मुंबई - दादर (पश्चिम) मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे धुळीच्या समस्येने परिसरातील रहिवाशांना होणाऱया त्रासाबाबत प्रसारमाध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले आहे. याविषयी बृहन्मुंबई महानगरपालिका स्पष्ट करण्यात येते की, छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी या मैदानावर दररोज फवारुन धूळ थोपविण्याचे प्रयत्न करण्यात येतात. तसेच मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच धुळीच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करुन, त्यांच्या सल्ल्याने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय देखील महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीच्या समस्येबाबत महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱया कामाच्या बाबत सविस्तरपणे नमूद करण्यात येते की, या मैदानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामध्ये पर्जन्य जल पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या. मैदान समतल करण्यात आले. यासह विविध कामे स्थानिक रहिवाशांसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीन्वये व तज्ञ सल्लागारांच्या सल्ल्याने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये प्रतिदिन पाणी फवारण्याकरीता सुमारे २,९०,००० लीटर पाण्याची आवश्यकता असते. मैदानावरील धूळ प्रदूषण थांबवून स्थानिक रहिवाशांना धुळीचा त्रास होवू नये म्हणून सदर मैदानात असलेल्या ३५ रिंगवेलमधील उपलब्ध पाणी संपूर्ण मैदानात फवारण्यात येते. त्यासोबतच मैदानावरील हिरवळीचे आच्छादन वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.
या मैदानावरील धुळीच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांची दखल घेत, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांना स्थानिक नागरिकांची भेट घेवून मैदानातील धूळ प्रदूषणाबाबत पुन्हा चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, उपआयुक्त बिरादार यांनी काल (दिनांक २७ ऑक्टोबर २०२३) छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे स्थानिक नागरिकांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यावेळी, सदर मैदानातील लाल माती काढून टाकावी अशी विनंती नागरिकांनी याप्रसंगी केली.
प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱया अनुयायांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानात व्यवस्था करण्यात येते. त्याची पूर्वतयारी कामे लवकरच सुरु होतील. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनाचे कामकाज झाल्यानंतर धूळ प्रदूषण विषयक कामे हाती घेण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
तसेच कायमस्वरुपी धूळ प्रदूषण रोखण्याकरीता कामे करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक केली जाईल. सदर सल्लागारामार्फत सुचविण्यात आलेल्या सूचना / उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. अशा मोठ्या स्वरुपाचे होणारे काम विविध खात्यांचा (जसे की, पर्यावरण, इमारत बांधकाम, पर्जन्य जल संचयन, मालमत्ता विभाग, उपवास्तुशास्त्रज्ञ (विकास नियोजन), पुरातन वारसा अर्थात हेरिटेज, उद्यान विभाग इत्यादी) समावेश करुन त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment