राज्यात महिला अत्याचारांत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2023

राज्यात महिला अत्याचारांत वाढ


मुंबई - राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यातील गंभीर बाब म्हणजे महिला विनयभंग आणि अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून मुंबईनंतर पुणे आणि नागपूर शहरात अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत.

मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यावर्षी पहिल्या ८ महिन्यांत मुंबईत महिलांच्या विनयभंग/अश्लील वर्तनाच्या १२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटींनी जास्त आहे.

याच कालावधीत बलात्काराच्या ५४९ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. ३०० मुली/अल्पवयीन तरुणींना फूस लावून किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे.

मुंबईनंतर राज्यात पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत पुण्यात विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात १२४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपुरातही गेल्या ८ महिन्यांत महिलांच्या विनयभंगाच्या ३०४ घटना घडल्या आहेत; तर १६५ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

विनयभंग किंवा महिलांशी अश्लील वर्तनाच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. समाजातील टवाळ युवकांचा विनयभंगाच्या आरोपींमध्ये मोठ्या संख्येने समावेश आहे. तसेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने ब-याच वेळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात. अनेकदा विनयभंग/अश्लील वर्तनाचे गुन्हे दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचे काही घटनांतून समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad