खेड / मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील मुंबईहून गोव्याकडे जाणारी एक मार्गिका ११ सप्टेंबरपासून हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली होणार असल्याने वाहनचालकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अपूर्णावस्थेतील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रणासाठी बोगद्याच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटातच सुस्साट होणार असला तरी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियम पाळूनच प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. (Travel through Kashedi tunnel will be smooth)
मुंबई – गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यातील एक मार्गिका अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली होणार असल्याने वाहनचालकांची बोगद्यातून प्रवास करण्याची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. याशिवाय अवघड वळणांचा घाट पार करण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागत होता. मात्र आता १० ते १५ मिनिटातच अंतर पार होणार आहे.
कशेडी बोगद्यातील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होण्याच्या पार्श्वभूमीवर कातळी – भोगाव भुयारी मार्गातील काम गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याला जोडणारा रस्ता ९० टक्के कॉक्रिटीकरणाने पूर्ण झाल्याचा दावा केला जात असून उर्वरित रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाचे काम देखील गतीने सुरू आहे. कशेडी बोगद्यातील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होवून गणेशभक्तांचा प्रवास वेगवान अन् आरामदायी होणार असला तरी कशेडी बोगद्यातून मार्गस्थ होत असताना वाहतुकीचे नियम पाळूनच प्रवास करावा लागणार आहे. बोगद्याची लांबी १.७१ किमी असून यादरम्यान वाहन न थांबवता ताशी ३० किमीच्या वेगाने मुख्य रस्त्यावर वाहन आणावे लागणार आहे. ठेकाधारक कंपनीने बोगद्यात सुरक्षेच्या कामांसह वीजपुरवठ्याची देखील परिपूर्ण व्यवस्था केली आहे.
No comments:
Post a Comment