ठाकरे गटाला शह देण्यासाठी अश्विनी जोशींची पालिकेत नियुक्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2023

ठाकरे गटाला शह देण्यासाठी अश्विनी जोशींची पालिकेत नियुक्ती


मुंबई - राज्य सरकारने आज सनदी अधिकारी  वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन, मंत्रालय, सचिव अश्विनी जोशी (Ashwini Joshi) यांची बदली मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी केली आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची (Shivsena) कोंडी करण्यासाठी जोशी ओळखल्या जातात. येत्या मुंबई महापालिका निवडणुका (Bmc Elelction) डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला शह देण्यासाठी जोशी यांची पालिकेत बदली करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

भाजपाच्या जवळच्या जोशी - 
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ही निवडणूक झालेली नाही. या दरम्यान पालिकेवर राज्य सरकारने आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. पालिकेत  गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात भाजपाचे (Bjp) सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासनीय आयएएस अधिकाऱ्यांना पालिकेत धाडले होते. डॉ. अश्विनी जोशी यांचा यात समावेश होता. जोशी यांनी पदभार स्विकारताच शिवसेनेचे प्रस्ताव रोखून धरण्याचे काम केले, असा ठपका त्यांच्यावर अनेकदा ठेवला होता. डोईजड होणाऱ्या जोशींच्या बदलीची मागणी वारंवार नगरसेवकांकडून सुरु होती. मात्र, २०१९ मध्ये राज्यात शिवसेनेची सत्ता येताच जोशी यांची बदली करण्यात आली. 

पालिका निवडणूक प्रतिष्ठेची - 
मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. पालिकेचा कार्यकाळ संपल्यावर दीड वर्षाहून अधिक काळ प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. पालिका निवडणूक हा भाजपाने प्रतिष्ठेचा विषय केला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा जीवाचा आटापिटा करत आहे. यासाठीच मुंबई महापालिकेत कौशल्य विकास मंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढा यांना स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्यासाठी अश्विनी जोशी यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर आणले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोण आहेत अश्विनी जोशी - 
डॉ. जोशी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ बॅचच्या अधिकारी असून त्यांनी शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई येथून बी.डी.एस. ही पदवीही संपादन केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी – नागपूर,  प्रकल्प अधिकारी - आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी - भंडारा जिल्हा परिषद, अतिरिक्त जिल्हाधिकारी - मुंबई उपनगर जिल्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी – अकोला व सिंधुदुर्ग, शिधावाटप नियंत्रक आणि संचालक - नागरी पुरवठा, मुंबई तसेच ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, सचिव वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन, मंत्रालय अशा विविध पदांवर काम केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad