मुंबई - महानगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्वावर देण्याबाबत धोरण आणत आहे. मात्र हे धोरण रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. (Abolish the Mumbai Municipal Corporation's policy of adopting plots)
यासंदर्भात जयंत पाटील यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे त्यात ते म्हणतात की, मैदाने व क्रीडांगणे यांची देखभाल पालिकेला परवडत नसल्यामुळे या मोकळ्या जागा दत्तक तत्त्वावर देण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. या धोरणावर मुंबईकरांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.
मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर असल्याने निखळ मनोरंजन आणि आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मोकळ्या जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनोरंजनासाठी अधिकाधिक सार्वजनिक मोकळ्या जागा उपलब्ध करून देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. यापूर्वीही पालिका प्रशासनाने काही व्यक्तींना भूखंड दत्तक दिले होते. मात्र त्या जागांवर त्यांनी व्यायामशाळा व इतर बांधकामे करून अतिक्रमण केले असल्याची बाब जयंत पाटील यांनी या पत्रात निदर्शनास आणून दिली आहे.
पुढे ते म्हणतात की, काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. तसेच, दत्तक दिलेले काही भूखंड परत घेणे अद्यापही पालिकेला शक्य झालेले नाही. अशी परिस्थिती असताना पुनश्चः पालिकेचे भुखंड खाजगी लोकांना दत्तक देण्याची धोरण आखण्याचे कारण समजून येत नाही. वार्षिक ५२ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेला स्वतःच्या उद्याने व भूखंडाची देखभाल करणे शक्य होत नसल्याची बाब निश्चितच भूषणावह नाही असे म्हणत त्यांनी पालिकेचे कान टोचले आहे.
No comments:
Post a Comment