हिंगोली - पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. पलिकडे एक कार्यक्रम होता, सरकार आपल्या दारी. सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी! अरे महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. जे-जे शेतक-यांच्या हिताचे असेल ते चिरडून टाकायचे, इतकेच काम हे इथे बसलेले आणि त्यांचे दिल्लीतील मायबाप करत आहेत, असा घणाघात शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोलीतील (Hingoli) रामलीला मैदानावर (Ramlila maidan) निर्धार सभा घेतली. या सभेतून त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्ला चढवला. तसेच त्यांनी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा देखील चांगलाच समाचार घेतला. केंद्रातील मोदी सरकारवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. डबल इंजिन सरकार, त्यात आता आणखी एक अजितदादांच इंजन लागल आहे. अजून किती डबे लागणार आहेत. जणू यांची मालगाडी होत आहे.
हिंगोलीत झालेल्या जाहीर सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरले जात असल्याच्या मुद्यावरून माझ्या वडिलांचे नाव का वापरता, दिल्लीतील वडिलांमध्ये हिम्मत नाही का, असा खोचक टोला लगावला. हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला.
डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौबल इंजन. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करण्याचे कर्तृत्व नाही का, अरे तुम्हाला नेते बाहेरचे लागतात. मात्र, वडील माझे लागतात. पक्ष फोडला, पक्ष तोडला अन् वडील माझे वापरायचे, का तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मते मागायची हिंमत राहिली नाही का, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी बीआरएसचे जाळे महाराष्ट्रात पसरविणा-या मुख्यमंत्री सी. चंद्रशेखर राव यांच्यावरही हल्लाबोल केला.
नाग समजून पूजा, पण त्याने डसले -
अनेक जण गद्दार झाले. मात्र, हिंगोलीतील जनता शिवसेना आणि भगव्याचे मागे राहिली. ज्या गद्दाराला आपण नाग समजून त्याची पूजा केली. पण तो फणा उलटा फिरवून डसायला लागला. त्यामुळे पायाखाली साप आल्यास त्याला काय करायचे, हे तुम्हाला कळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार बांगर यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नाव हिंदुत्वाचे, धंदे मटक्याचे -
नाव हिंदुत्वाचे, पण धंदे मटक्याचे. असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का? हा माझा प्रश्न आहे. मटक्याचे अड्डे चालवणा-याला हिंदू मानायचं का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
No comments:
Post a Comment