मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2023

मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण


मुंबई - 'रेबिजमुक्त मुंबई’ (Rabies free Mumbai) साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि योडा व कॅप्‍टन इंडिया झिमॅक्‍स या स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर २६ भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात आले. लसीकरणानंतर या भटक्‍या श्‍वानांच्‍या (Dogs) गळ्यात 'क्‍यूआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्‍यात आले आहे. परिणामी, क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणा-याचा (फिडर) तपशील, लसीकरण, निर्बिजीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱया रेबिज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी विविध स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्‍हणून २५ जुलै २०२३ रोजी मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्‍थांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. केवळ निर्बिजीकरण, लसीकरण यांवर न थांबता श्‍वानांच्‍या आरोग्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका आता अत्‍याधुनिक उपाययोजना राबविणार आहे.

सन २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्‍वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या श्‍वानांच्‍या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. दर दहा वर्षांनी श्वान जनगणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे . त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहिम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.

मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा राबता असतो. लाखो प्रवाशांची दररोज ये - जा असते. घरगुती आणि आंतरराष्‍ट्रीय विमानतळ असल्‍याने या परिसरात नागरिकांची सातत्‍याने वर्दळ असते. अनोळखी व्‍यक्‍ती दिसल्‍यावर श्‍वानांची आक्रमकता वाढते. श्‍वानदंशांच्‍या घटनांबरोबरच प्रसंगी उपद्रव वाढतो. या घटना विचारात घेता, भटक्‍या श्‍वानांच्‍या रेबिज लसीकरणाचा पथदर्शी प्रकल्‍प मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाबाहेर राबविण्‍यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्‍या अधिका-यांनी पुढाकार घेतला. त्‍यानुसार, मंगळवारी, दिनांक २२ ऑगस्‍ट २०२३ रोजी योडा व कॅप्‍टन इंडिया झिमॅक्‍स या स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या सहायाने २६ श्‍वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात आले. तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे. या उपक्रमासाठी या दोन्ही स्‍वयंसेवी संस्था निशुल्क सेवा देत आहेत. भटक्‍या श्‍वानांसाठी ‘युनिक आयडेंटिफिकेशन टॅग’ तयार करण्यात आले असून त्‍याद्वारे मुंबईतील भटक्या श्‍वानांची केंद्रीकृत सांख्यिकी माहिती (डेटाबेस) मिळण्‍यास मदत मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad