मुंबई (जेपीएन न्यूज) - पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या सारख्या पत्रकारांना शिवीगाळ करून त्यांना भाडोत्री गुंडांकरवी मारहाण केल्याप्रकरणी आमदार किशोर पाटील यांच्या सारख्या प्रवृतींच्या आमदार व गुंडांवर आणि पत्रकारांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या, पत्रकारांची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. पत्रकारांच्या संरक्षणासाठी बनविलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आज मुंबईतील १३ पत्रकार संघटनांनी व राज्यातील विविध २५० पत्रकार संघटनांनी जिल्हा, तालुका पातळीवर उत्स्फूर्त निदर्शने करीत पत्रकार संरक्षण कायद्याची जाहीर होळी करून राज्य सरकारचे लक्ष वेधले.
आपला जीव धोक्यात घालून अन्याय, अत्याचार सहन करणाऱ्या पत्रकारांना कायद्याचे संरक्षण देण्यात यावे. जोपर्यंत पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई होत नाही तोपर्यंत पत्रकारांचा सनदशीर मार्गाने लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला. तसेच या आंदोलनानंतर तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविले जावेत आणि पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीस मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघ, टीव्हीजेए, बीयुजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पाॅलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन, म्हाडा पत्रकार संघ, उपनगर पत्रकार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी, जनता दल (सेक्युलर) मुंबई तर्फे रवी भिलारे (पत्रकार) यांनी उपस्थिती दर्शवून पाठींबा दिला.
हुतात्मा चौकात अभिवादन करणाऱ्या ५० पत्रकारांची पोलिसांकडून धरपकड -
पाचोरा येथील स्थानिक पत्रकार संजय महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर गुंडांकरवी भ्याड हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात मुंबईतील ११ पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करीत उत्स्फूर्तपणे निदर्शने केली. प्रारंभी पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख, नरेंद्र वाबळे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक येथे शांतपणे हुतात्म्यांना पुष्प वाहून अभिवादन केले. याप्रसंगी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने अरेरावीपणा करीत जबरदस्तीने ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख, नरेंद्र वाबळे, किरण नाईक, शरद पाबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, नरेंद्र वाबळे, संदीप चव्हाण, मारुती मोरे, दीपक पवार, राजन पारकर, विनायक सानप, विशाल परदेशी आदी ५० पत्रकारांची धरपकड करून त्यांना जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये कोंबून आझाद मैदानात आणून सोडून देण्यात आले.
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा - एस. एम. देशमुख
पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करून त्यांना गुंडांकरवी मारहाण केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. गेल्या ४ वर्षात राज्यातील २२५ पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. काही पत्रकारांच्या हत्या करण्यात आल्या. फक्त ३७ प्रकरणात कायदेशीर पण थातुरमातुर कारवाई करण्यात आली. पत्रकार संरक्षण कायद्याची नीटपणे अंमलबजावणी होत नाही, अशी खंत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच,
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
तोपर्यंत पत्रकारांचा लढा सुरूच राहील - नरेंद्र वाबळे
पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतानाही पत्रकार शशिकांत वारिसे यांची हल्लेखोरांनी हत्या केली. आता पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांवरील हल्ल्याची योग्य दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळेच आम्ही निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून निषेध व्यक्त केला आहे. जोपपर्यंत सदर कायद्याची नीटपणे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पत्रकार संघटना शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवतील, असा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी यावेळी सरकारला दिला.
प्रेस कौन्सिलमार्फत होणार चौकशी - गुरबीर सिंग
पत्रकारांच्या हितासाठी स्थापित प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची झालेली हत्या आणि पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्याडून झालेली शिवीगाळ आणि गुंडांनी केलेली जीवघेणी मारहाण या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडून नियुक्त फॅक्ट फायंडिंग कमिटी लवकरच महाराष्ट्रात येणार आहे, अशी माहिती देत प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग यांनी पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
No comments:
Post a Comment