मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गुरूस्थानी असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच शिवसेनेची ताकद वाढली आहे. उबाठा गटातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार तुकाराम काते यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. विशेष म्हणजे मुंबईतील उबाठा गटाचे आणि काँग्रसचे अनेक नगरसेवकही विकासाची कास धरत शिवसेनेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं.
हिंदुत्त्व या मुद्द्यावर आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत शिवसेना आल्यापासून उबाठा गटातील अनेक जण शिवसेनेच्या साथीला आले. यात आमदार नीलम गोऱ्हे यांच्यापासून मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे अशा अनेक नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामांचा धडाका लावत आपली कार्यतत्परता दाखवून दिल्याने उबाठा गट तसंच इतर पक्षांमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत शिवसेनेची कास धरली.
या नावांमध्येच शनिवारी आणखी एका मोठ्या नावाचा समावेश झाला. मुंबईच्या अणुशक्ती नगरचे माजी आमदार तुकाराम काते यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तुकाराम काते यांच्यासह उबाठा गटाचे मुंबईतील अनेक नगरसेवकही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले. त्याशिवाय काँग्रेसच्या काही नगरसेवकांनीही हाती शिवसेनेचा भगवा घेत विकासाला प्राधान्य दिलं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा आणि मुंबईचा कायापालट करण्यात आमचंही योगदान असावं, यासाठी आम्ही शिवसेनेत आलो, अशी प्रतिक्रिया तुकाराम काते यांनी व्यक्त केली.
काते यांच्यासह इतर नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची मुंबईतील ताकद आणखीच भक्कम झाली आहे. तसंच महाराष्ट्रभरातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक होत असून आणखी काही बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते.
No comments:
Post a Comment