नवी दिल्ली - आयुष्मान भारत योजनेबाबत (Ayushman Bharat Yojana) भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकचा (कॅग CAG) आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये आधीच मृत्यू झालेल्या ३,४४६ रुग्णांच्या उपचारासाठी एकूण ६.९७ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण डेटाबेसमध्ये मृत दाखवण्यात आले आहेत. आयुष्मान भारत योजनेबाबत असा अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही कॅगच्या अहवालात एकाच मोबाईल क्रमांकावर ७.५ लाखांहून अधिक लोकांची नोंदणी करण्यात आली होती आणि तो क्रमांकही अवैध असल्याचे समोर आले होते. (Ayushman Bharat Yojana Scam)
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागांत सुरू झालेल्या गरिबांना मोफत उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. ही योजना अत्यंत चांगली असल्याचा डांगोरा सातत्याने पिटला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात किती भोंगळ कारभार झाला आहे, हे कॅगने दाखवून दिले आहे.
कॅगने आयुष्मान भारत योजनेच्या डेटाबेसचे ऑडिट सुरू केले, तेव्हा त्या डेटाबेसमध्ये अनियमितता आढळून आली. या योजनेच्या व्यवहार व्यवस्थापन प्रणालीमध्ये आधीच मृत घोषित झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आणि त्यासाठी पैसेही दिले गेल्याचे समोर आले होते. त्यांचे उपचार चालू होते. म्हणजेच यातील हजारो रुग्णांवर आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार होत असल्याचे दाखवलं जात होते. देशभरातील विविध रुग्णालयांत एकूण ३,४४६ रुग्ण होते, ज्यांच्या उपचारांसाठी रुग्णालयांना ६.९७ कोटी रुपये दिले गेले.
सर्वाधिक रुग्ण केरळमधील -
आयुष्मान योजनेतंर्गत आधीच मृत्यू झालेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी तब्बल ६.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. अशा रुग्णांची संख्या केरळमध्ये सर्वाधिक आहे. येथे असे एकूण ९६६ रुग्ण आढळले आहेत, ज्यांना मृत घोषित केल्यानंतरही त्यांच्यावर उपचार केले जात होते. यानंतर मध्य प्रदेशात ४०३ आणि छत्तीसगडमध्ये ३६५ रुग्ण आढळले आहेत.
No comments:
Post a Comment