मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागात अस्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मुंबई शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असलेली उंदरांची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेने तसेच ड्रग्स सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने मोहीम राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
पालकमंत्री केसरकर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात जाऊन ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या अंतर्गत बुधवारी त्यांनी ‘एफ उत्तर’ विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे त्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, तमिल सेलवन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील रहिवाशांनी मांडलेल्या समस्यांमध्ये प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणे, परिसराची स्वच्छता, नालेसफाई, वाहतुकीची समस्या सोडविणे, अतिक्रमणे काढणे, ई – सेवा केंद्र सुरू करणे, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या समस्या आदींचा समावेश होता.
मंत्री केसरकर म्हणाले की, मुंबई ड्रग्स मुक्त करणे, भिकारीमुक्त करणे, फुटपाथ वरील लोकांचे रेकॉर्ड तयार करून त्यांची स्वतंत्र सोय करणे आणि त्यानंतर फुटपाथवर लोकांची संख्या वाढणार नाही याची दक्षता घेणे, २०११ नंतरच्या झोपड्या वाढणार नाहीत याची दक्षता घेणे, वाहतूक नियमनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे, कचरा करणाऱ्यांना दंड करून शहर स्वच्छ राखणे, शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी पंपांची देखभाल दुरूस्ती करून आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पंपांची सोय करणे आदी प्राधान्याचे विषय आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
No comments:
Post a Comment