भाजपचे हिंदूत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक - शरद पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2023

भाजपचे हिंदूत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक - शरद पवार



मुंबई - शिवसेनेचे हिंदूत्व आहे ते लपवून ठेवत नाही ते हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदूत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसामध्ये वितंडवाद वाढवणार... विद्वेष वाढवणारं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केला.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मोठ्या गर्दीत पार पडली. यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या संकटाना सामोरे जाताना 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' अशी हाक दिली.

मधल्या काळात शाहूंच्या कोल्हापूरात, अकोला, नांदेड याठिकाणी दंगली झाल्या. या दंगलीत कोण होतं हे सर्वांना माहित आहे. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथे आपली सत्ता नाही त्याठिकाणी समाजासमाजात विद्वेष वाढवायचा आणि त्याचा राजकीय फायदा घेता येईल का यासंबंधी भूमिका घेतली गेली असा आरोपही शरद पवार यांनी केला.

जो समाजातील ऐक्याला तडा लावतो. जातीय धर्मात अंतर वाढवतो तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही. आज जे राष्ट्रप्रेमी नाहीयेत त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीत महागाईचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे.महाराष्ट्रात सहा महिन्याच्या कालावधीत चार हजारपेक्षा महिला बेपत्ता झाल्या. मुली सुरक्षित नाही. त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाही असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यांनी आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे या लोकांवर भरवसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करणं हा एककलमी कार्यक्रम करायचा आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

आज चर्चा आहे कुणासोबत किती आमदार आहेत याची. आमदार आणता येतात. गेले त्यांची चिंता करू नका ते सुखाने राहू देत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सामुहिक शक्तीतून नक्की नव्याने कर्तृत्ववान अशा लोकांची पिढी, नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करु असा आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

आजची बैठक ऐतिहासिक आहे संबंध देशाचे लक्ष लागले आहे तशी चर्चाही या बैठकीची सुरू आहे. २४ वर्षापूर्वी मुंबईत तुमच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जन्म झाला. शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली. २४ वर्षे झाली यामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. अनेक कार्यकर्ते आमदार, मंत्री, खासदार झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य कसं चालवू शकतो हे राष्ट्रवादीमुळे देशाला समजले. अनेक नवीन नेते तयार केले. मनात एकच भावना होती की, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घेतली त्यामध्ये तुमच्या कष्टाने आपण त्यामध्ये यशस्वी झालो. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत.ती संकट ज्याची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामधे देशाची सूत्रे आहेत. ज्यांच्या हातामध्ये सुत्रे आहेत त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांनासुध्दा त्यांना म्हणावी तशी कल्पना मांडण्यासंदर्भात मर्यादा आहेत असेही शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारमध्ये मी काम केले आहे मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम केले. विरोधी पक्षनेता म्हणून दिल्लीत काम केले. या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितली आहे. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे त्यातून मार्ग काढणे हे सुत्र या देशात अनेक वर्षापासून चालू होते. आज चित्र बदलले आहे लोकशाहीमध्ये सरकार व जनता यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. मी चारवेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझी पध्दत होती आपण महत्वाचा निर्णय घेतलातर त्या निर्णयासंबधी सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो लोकांशी बोलावे लागते लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. जे अयोग्य असेल ते दुरुस्त केले पाहिजे आज तो संवाद देशात नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही.लोकांमध्ये आहोत. कधीकाळी सामान्य माणसाची दु:ख आणि त्यांची स्थिती समजते त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते पण संवाद राज्यकर्त्यांचा नसेल तर चित्र वेगळे दिसते. आज सर्व राज्यात एकप्रकारे अस्वस्थता आहे. आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले लोकशाहीला टिकवायची असेल, संसदीय पध्दतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात नाही त्यांच्याशी साधला. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पंतप्रधानांनी तर राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याअगोदर बारामतीच्या सभेत प्रशासन कसे चालवायचे हे पवारसाहेबांचे बोट धरुन शिकलो. नंतर निवडणूकीत आले तेव्हा प्रचंड टिका केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी संयमी बोलण्याची काळजी घेतली पाहिजे. नुसते आरोप करुन चालणार नाही. जर कुणी चुकीचे काम केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सत्य सांगितले पाहिजे. पण त्यांनी ती धमक दाखवली नाही. देशाचे नेते आहोत, राष्ट्रीय पक्षाचे आहातच परंतु जनसामान्यांच्यासमोर बोलतो त्यावेळी त्याप्रकारची सभ्यता आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत त्या पाळल्या जात नाहीत अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का बरोबर घेतले. तुमच्या मंत्रीमंडळात कसे काय? याचा अर्थ असा आहे आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसामध्ये एकप्रकारे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज विधिमंडळाचे सदस्य, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, खाजगीत सांगतात असेही शरद पवार म्हणाले.

आज काही लोकांनी बाजुला जाण्याची भूमिका घेतली माझी काही तक्रार नाही मला त्याचे दु:ख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाम गाळून विधीमंडळात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांना चांगले दिवस आणले. त्यांना विश्वासात न घेता पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली हे योग्य नाही. चुकीच्या विचारांच्या बाजूला जाऊन बसण्याची वेळ आली हे चांगले नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

नाशिकला पक्षाच्या कार्यालयात ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगा आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस असे कसे म्हणता येईल. उद्या कुणीही उठेल मी राष्ट्रवादीचा आहे सांगेल, मी शिवसेना आहे सांगेल, मी भाजप आहे सांगेल, याला काही अर्थ आहे का? त्यामुळे अशाप्रकारची भूमिका मांडून ताबा घेणे योग्य नाही.हे लोकशाही मध्ये योग्य आहे का? असा सवाल करतानाच यासाठी शरद पवार यांनी कॉंग्रेसमध्ये असताना टिळकभवन आमच्याकडे होते नवीन पक्ष काढायचा निर्णय घेतला त्यानंतर ते कार्यालय सोडून देण्याचा निर्णय घेतला ती प्रॉपर्टी कॉंग्रेस पक्षाची होती. आम्ही ती हिसकावून घेतली नाही ही आठवण सांगितली. काल नाशिकमध्ये पक्षाची प्रॉपर्टी काही लोक पोलिसांची मदत घेऊन घेत आहेत. हा पक्ष आमचा आहे घड्याळ आमचे, त्यावरील चिन्ह आमचे आहे. ठिक आहे. तुम्ही म्हणू शकता निवडणूक आयोगाने घड्याळाचे चिन्ह कुणाला दिले हे देशाला माहित आहे. तुमच्यासाठी सांगतो कोण कुठे जाणार नाही. हे चिन्ह देशाचे राजकारण ठरवते माझ्या व्यक्तीगत जीवनात अनेक निवडणूका लढलो आहे. १९६७ साली पहिली निवडणूक केली माझे चिन्ह बैलजोडी होती. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये दोन भाग झाले. बैलजोडी गेली गायवासरु चिन्ह आले. त्यानंतर चरखा नंतर हात आला मग घड्याळ आले. मी हात, चरखा, गायवासरु, बैलजोडी या चिन्हावर लढलो त्यामुळे कोण सांगत असतील चिन्ह आम्ही घेऊन जाऊ पण एक सांगतो चिन्ह जाणार नाही आणि मी ते जाऊ देणार नाही असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

चिन्ह घेऊन जाणार असाल तर कुठलंही चिन्ह असेल. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका खोल आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वासही शरद पवार यांनी दिला.

आज माझ्यावर काही लोक बोलले. त्यांनी बोलताना मी त्यांचा गुरु आहे. आज मुंबईभर माझे फोटो लावले आहे. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही जे नाणं घ्यायचे ते नाणं चालणारं पाहिजे कारण त्यांचे नाणं खरं नाहीय ते खणकन वाजणार नाही. हे लोक ओळखतील त्यामुळे नको ती अडचण म्हणून फोटो लावत आहेत असेही शरद पवार म्हणाले.

आज अनेकांनी भाषणे केली. राज्यात पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपूरला जावं लागतं असं नाही कानाकोपऱ्यातील लोक वारीमध्ये जातात त्यांच्या अंतःकरणात एकच भावना असते पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे, पंढरीला पोचल्यानंतर मंदिरातसुध्दा जाता येत नाही बाहेरुन नवस करतात आणि आनंदाने परत जातात. त्यामुळे ती अवस्था आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, गुरु मानायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं...ही गमतीशीर गोष्ट आहे असेही शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना कसे मंत्री केले याची माहितीही शरद पवार यांनी यावेळी दिली.

राज्यकर्ते असे असले पाहिजे की, राज्य तरी एकत्र ठेवायचे... आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. त्यांनी अनेक वेळा भाषणे केली हे राज्य तोडले पाहिजे, वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही असे बोलत होते पण आज काय झालं विदर्भाच्या प्रश्नामध्ये हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही. दिलेला शब्द कुणी पाळला नाही. आणि कारण नसताना आज राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी केली आहे. कसे राज्य चालेल आज आपले सहकारी गेले. दहा दिवसांपूर्वी त्यांचे भाषण आपण ऐकले. महाराष्ट्राच्या इतिहासात असला मुख्यमंत्री पाहिला नाही हे भाषण आहे त्यांचे आता असल्या मुख्यमंत्र्यांबरोबर नमस्कार म्हणून काम करायचे आहे.कुणाबरोबर काम करतोय आपण... असे सांगितले गेले की, शरद पवारांनीसुध्दा पुलोद सरकार बनवलं होतं. हो बनवलं होतं. आणीबाणीच्यानंतर हा निकाल सर्वांनी घेतला. कॉंग्रेस नेत्यांनी व सगळ्यांनी घेतला व सर्वांनी मला सांगितले की नेतृत्व तुम्ही करा पण त्याठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता तर तो जनता पक्ष होता. जयप्रकाश नारायण यांच्या विचारातून एक अनेक पक्ष जन्माला आले बाकीचे सर्व पक्ष विसर्जित केले त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता तर जनता पक्ष होता त्यांच्या मदतीने हे देशपातळीवर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ७५ टक्के राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष केलेला आहे याची आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

असे सांगण्यात आले आम्ही भाजपसोबत गेलो चुकलं काय? नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली. खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा नागालँड असेल मणीपूर तो संबंध भाग एक प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर जी छोटी छोटी राज्य आहेत. तिथे अतिशय बारकाईने निर्णय घेतला. त्यामुळे बाहेरून पाठिंबा दिला. इथे काय झाले तर आत जाऊन बसले त्यामुळे ते उदाहरण देतात ते ठीक नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपसोबत आम्ही गेलो यात काही चूक नाही. जे जे लोक या देशात भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा एक इतिहास आठवा. अकाली दल आणि भाजपचं सरकार बनलं पुढे ते सरकार चालले नाही अकाली दलाला मोडतोड करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला. पंजाबमध्ये भाजपने अनेक वर्षे एकजूट होती ती उध्वस्त करण्याचे काम केले. तेलंगणा, बिहार, आंध्रप्रदेश याठिकाणी काही महिने सत्ता चालवली आणि जे सोबत आले तिथे काही महिने ठिक चालते आणि त्यानंतर मित्रांना भाजपने संपवले आहे. किंवा तिथल्या पक्षांची मोडतोड केली आहे.हेच सुत्र भाजपचे आहे. त्यामुळे आज कुणी जायचा निर्णय घेतला असेल तर तो घेऊ शकतात. परंतु तो पक्षात बसून घेतला असता तर ते अधिक चांगले झाले असते असेही शरद पवार म्हणाले.

ही गोष्ट लक्षात ठेवा की इतर राज्यात जे घडले ते वेगळे याठिकाणी घडणार नाही. आज सांगितले जाते की, आम्ही भाजपसोबत गेलो ती चूक केली नाही. तुम्ही शिवसेनेसोबत गेलात. शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. आणीबाणीच्या काळात संबध देशात इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशात वातावरण होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केले की देशाच्या या घटनेत इंदिरा गांधी यांना मदत केली पाहिजे. त्यांना पाठिंबा दिला. त्यांना सहकार्य इतके केले की विधानसभेची निवडणूक या राज्यात शिवसेनेने एकसुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि कॉंग्रेसला पाठिंबा दिला. का तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळे वातावरण होते. त्या वातावरणात आणखी कटुता वाढू नये यासाठी एकीसाठी हा निर्णय घेतला होता. मनोहर जोशी आणि दोघांना विधीमंडळात जागा दिली. इंदिरा गांधीच्या काळातसुद्धा शिवसेनेला कॉंग्रेसने पाठिंबा दिला. आणि आज असं सांगितलं जाते आहे की, तुम्ही शिवसेनेबरोबर गेलात, याचा अर्थ तुम्ही भाजपसोबत गेलात फरक आहे दोघांमध्ये असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

'उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...' या दोन ओळी बोलून शरद पवार यांनी सभेची सांगता केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad