पोलीस भरतीसाठी २३ जुलैला लेखी परीक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2023

पोलीस भरतीसाठी २३ जुलैला लेखी परीक्षा


मुंबई - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी  २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८  वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
              
या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत. जर उमेदवारांनी बॅगा आणल्यास त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवण्यात याव्यात. या बॅगा व त्यातील मौल्यवान व इतर वस्तू गहाळ किंवा चोरीस गेल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
            
परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही लेखी परीक्षा नि:पक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये. तसेच ही बाब निदर्शनास आल्यास तत्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे समादेशक प्रणय अशोक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad